राज्य

जब तक जगह नही, तब तक ठाणा नही-आयजी प्रसन्ना

जालना- शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मनुष्य बळा सोबतच पोलीस चौक्यांची संख्याही वाढवावी अशी मागणी आज व्यापारी आणि शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक के मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्याकडे केली.

श्री. प्रसन्ना हे कालपासून जालना जिल्हा दौऱ्यावर आहेतआणि पोलिसांची दप्तर तपासणी करीत आहेत. काल मंठा आज सदर बाजार पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाची तपासणी त्यांनी केली.त्या नंतर शोभा प्रकाश मंगल कार्यालयात व्यापारी आणि शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पोलिसांविषयी असलेल्या समस्यांचा पंचनामाच केला. आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर ठपका ठेवला. त्यासोबत शहरात वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, सिग्नल, सीसीटीव्ही कॅमेरे, चोरांचे वाढलेले प्रमाण, अशा सर्वच गोष्टींनी पोलिसांचाच पंचनामा केला.

या सर्व प्रश्नांना उत्तर देताना श्री प्रसन्ना म्हणाले, चौक्या उभ्या करून उपयोग नाही. तिथे दोन-तीन हवलदार देऊन उपयोग होणार नाही तर पूर्ण पोलीस ठाणे देतो. मात्र त्यासाठी पोलिसांना स्वतःची जागा हवी आहे ती जागा दिली तर पोलीस ठाणे देणे देखील शक्य आहे. त्यासाठी मोंढ्या मध्ये मध्ये आणि औद्योगिक वसाहतीमध्ये जागा देण्याची मागणीही त्यांनी केली. दरम्यान पोलिसांची बाजू सावरत असताना ते म्हणाले की, पोलीस म्हणजे वेअर हाऊस नाहीत, की जिथे मनुष्यबळ जास्त झाले म्हणून तिथं साठवून ठेवता येईल. पोलिसांची संख्या अपुरी आहे त्यामुळे एकीकडे वाढवली की दुसरीकडे कमी होणारच. खरे पाहता सर्वच गोष्टी वाढल्या आहेत. शहराची सीमारेषा वाढली, लोकसंख्या वाढली, चलन वाढलं, वाहने वाढली, त्यामुळे नागरिकांनी देखील आपली स्वतःची जबाबदारी पार पाडली पाहिजे. प्रत्येक गोष्टींसाठी पोलिसांवर अवलंबून राहता कामा नये. पोलिसांच्या कामाचा आढावा घेत असताना आपणही आपल्या दुकानात येणार्‍या ग्राहकांच्या वाहनाची व्यवस्था केली का? याचाही विचार व्यापाऱ्यांनी करावा. त्यासोबत रात्रीच्या वेळी दुकानातून रक्कम घरी नेण्याची गरजच नाही. त्याला दुसरा पर्याय म्हणून ऑनलाइन देखील तुम्ही व्यवसाय करू शकता. एवढेच नव्हे तर काही बँका अशाही आहेत की ज्या तुमच्या दुकानात येऊन तुमची रोख रक्कम घेऊन जाऊ शकतात. मात्र कदाचित हा पैसा एक नंबर मध्ये दाखवायचा नसेल त्यामुळे देखील अशा पद्धतीने या पैशाची वाहतूक होत असण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. व्यापाऱ्यांनी तसे करू नये आणि आपली रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी बँकांचा उपयोग करावा असेही ते म्हणाले . ते पुढे म्हणाले ,आपली काळजी आपणच घेतली पाहिजे त्यामुळे व्यापाऱ्यांनी आणि जनतेने स्वतःसाठीच सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. याचा उपयोग पोलिसांना कमी आणि स्वतःला जास्त होईल . दरम्यान अनेक जण पोलीस त्रास देतात म्हणून कॅमेरे बसवत नाहीत. मात्र हे खरे नाही एखादी घटना घडली असेल तर तेवढ्या वेळा पुरताच व्हिडिओ पोलीस यंत्रणा मागते इतर तुमच्या डीव्हीआर ला ते हातदेखील लावत नाहीत आणि लावणारही नाहीत. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला दरम्यान या बैठकीनंतर त्यांनी उपस्थित महिलांचे आणि नागरिकांचे सत्कारही स्वीकारले. यावेळी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, यांच्यासह सर्व पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते. या बैठकीला उद्योजकांच्या वतीने कालिका स्टील चे संचालक घनश्याम गोयल, जालना मर्चंट बँकेचे अध्यक्ष अंकुश राऊत, सतीश पंच विनीत सहानी आदींची उपस्थिती होती.
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.