राज्य

नाशिक येथील साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर फेकली शाई

नाशिक – नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी म्हटले. रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.साहित्य संमेलनाच्या मुख्य स्टेजच्या मागच्या बाजूला ही घटना घडल्याची माहिती आहे. गिरीश कुबेर यांच्यावर केलेल्या या शाईफेकीनंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या, नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखक व संपादक गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्यात आली. साहित्यिक व पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले निषेधार्ह आहेत. या घटनेचा तीव्र निषेध. असं म्हणत सुळे यांनी आपली नाराजी दर्शविली आहे.  दुसऱ्या बाजूला राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या सर्वांचेच दैवत आहेत.काही चुकीचे लिहिले असेल तर त्याचा निषेधच झाला पाहिजे.परंतू साहित्य संमेलनात शाईफेक करणे हे चुकीचे आणि निषेधार्ह आहे. संमेलन ही अभिव्यक्तीची जागा आहे. चुकीच्या विचारांना तर्क आणि पुराव्यांनी उत्तर दिले पाहिजे असं फडणवीस यांनी म्हटले आहे.

*edtv news nashik*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.