या अटींच्या अधीन राहून गणेशोत्सवाला परवानगी
जालना-Covid-19 च्या परिस्थितीमध्ये सुमारे 13 अटींच्या अधीन राहून गणेशोत्सवाला परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी नुकतेच आदेश जारी केले आहेत. या देशांमध्ये सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवासाठी काही बंधने घातली आहेत. त्यामुळे आता गणेश भक्त तयारीला लागण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवावर सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडले आहे. मात्र यावर्षीची तीव्रता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी काही नियमांच्या अधीन राहून सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेश मूर्तीची उंची चार फुटापर्यंत तर घरगुती गणेशाची मूर्ती दोन फुटांपर्यंत मर्यादित केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी नगरपालिका किंवा स्थानिक प्रशासनाची पारंपारिक पद्धतीने पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे, त्यासोबत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याऐवजी आरोग्य विषयक कार्यक्रम घ्यावेत आणि त्यामध्ये रक्तदान, डेंगू, मलेरिया,यावर प्रतिबंधात्मक उपाय असे देखावे करावेत, असेही सूचित करण्यात आले आहे. भजन किर्तन असे धार्मिक कार्यक्रम करताना होणारी गर्दी टाळावी, गणरायाच्या आगमनासाठी आणि विसर्जनासाठी मिरवणूक काढण्यात येऊ नये, तसेच गणेश विसर्जनाच्या ठिकाणी करण्यात येणारी आरती घरीच करून घ्यावी आणि विसर्जनाच्या ठिकाणी कमीत कमी वेळ थांबावे असेही सूचित करण्यात आले आहे.
या नियमांचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल ,असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिला आहे. गणेशोत्सव संदर्भातील प्रशासनाची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यामुळे आता गणेश भक्त पुढील कामाला लागतील असे चित्र दिसत आहे. शुक्रवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे.