Talukaजालना जिल्हा

सोडायला गेला भांडण आणि गमावला जीव: भोकरदन येथील घटना

 दोन मित्रांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुण हॉटेल चालकाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना गुरुवारी रात्री १० वाजता भोकरदन शहरा जवळील फत्तेपूर रोड वर घडली आहे.
 सागर भारत बदर ( २७, रा. वालसा खालसा ) असे खून झालेल्या हॉटेल चालक तरुणाचे नाव असून, त्याचा दीड महिन्यापूर्वीच विवाह झाला होता हे विशेष.
 गुरुवारी रात्री सागर बदर हा मित्र कैलास गजानन फुके ( रा. फत्तेपुर ) याचा लहान भाऊ सुनीलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भोकरदन-जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये गेला होता. वाढदिवस साजरा झाल्यानंतर जेवण करण्यापूर्वी कैलासला जुने वाद असलेल्या योगेश पुंजाजी फुकेने फोन केला.
आपल्यातील जुने वाद मिटवून टाकु तु फत्तेपूर रोडवरील २२० केव्ही केंद्राजवळ ये असे सांगत योगेशने कैलासला बोलावून घेतले. कैलासने सागरला सोबत घेत दुचाकीवरून केंद्र गाठले. यावेळी कैलास व योगेश यांच्यात बाचाबाची झाली. मात्र, सागर व इतरांनी भांडण मिटवले. यानंतर कैलास दुचाकी चालविण्यासाठी बसला, त्याच्यामागे सागर बसण्यासाठी निघाला. याच दरम्यान योगेशने सागरच्या पोटात चाकू खुपसला.
अचानक झालेल्या वारामुळे सागर खाली कोसळला. हे पाहताच योगेश फुकेने तेथुन पळ काढला. कैलास व इतरांनी सागरला भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रक्तस्त्राव जास्त होत असल्याने डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी त्याला जालना येथे पाठवले.मात्र, जालना येथे पोहचण्यापूर्वीच रात्री ११ वाजेच्या सुमारास सागरचा मृत्यू झाला. या प्रकरणात सागरच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून योगेश फुके विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, मयत सागर चे लग्न होऊन केवळ दीड महीनाच झालेला असल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
जालना येथे सागर याचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याच्या गावी वालसा(खालसा)येथे दुपारी 3.00वाजेच्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताज्या आणि सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtv jalna app.

Related Articles