घर घर- तिरंगा, मन- मन तिरंगा, अभाविपच्या उपक्रम
जालना-अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील 5000 कुटुंबापर्यंत पोहोचून “घर -घर तिरंगा, मन- मन तिरंगा” हा संदेश पोहोचविण्याचा संकल्प अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे.
जालना जिल्ह्यातील 73 गावांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे आणि यासाठी वीस ठिकाणांची निवड करून 114 कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या उपक्रमाविषयी माहिती देताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री अंकिता पवार म्हणाल्या,” घर- घर तिरंगा, मन -मन तिरंगा” हे ब्रीदवाक्य घेऊन घराघरावर राष्ट्रध्वज लावण्यात येणार आहेत. तालुका शहर व गावांसाठी अभियान प्रमुखांवर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे .भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आणि यामध्ये नागरिकांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असणार आहे. वर्षभरासाठी पंच्याहत्तर विविध उपक्रमांची योजना आखण्यात आली असल्याचेही अंकिता पवार यांनी सांगितले.
दरम्यान जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये प्रशासकीय ध्वजारोहणाच्या वेळेनुसार हा उपक्रम राबविला जाणार आहे. या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जिल्हा सहसंयोजक श्रेया चंदन ,शहर मंत्री वेदांत खैरे, अभियान प्रमुख आकाश चाफाकानडे यांची उपस्थिती होती.
ताज्या आणि सविस्तर बातम्या पाहण्यासाठी डाऊनलोड करा edtv jalna app