जालना जिल्हा

रेल्वे स्थानकाच्या बाजूला लवकरच भुयारी मार्ग

जालना- जालन्यातील रेल्वे स्थानक परिसरात राहणाऱ्या हजारो नागरिकांचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. वारंवार फाटक बंद राहत असल्यामुळे शाळकरी विद्यार्थी चाकरमाने, दूध विक्रेते आणि कामगार वर्गाला याचा मोठा फटका बसत होता. मात्र आज रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी केली आणि नियोजित नकाशाप्रमाणे 22 तारखेपासून कामही सुरू करणार असल्याचे सांगितले.

जालना रेल्वे स्थानकाला  लागून रेल्वेचे गेट आहे आणि हे गेट रेल्वेची संख्या वाढल्यामुळे सारखे बंद राहायचे. त्यातच एखादी मालगाडी जर असेल तर तीन ते चार तास  घंटे गेट बंद राहायचे.  यामुळे नागरिकांना विनाकारण तीन किलोमीटर दूर चक्कर मारून जावे लागत होते.पैसा आणि वेळही खर्च व्हायचा. यामध्ये सर्वात जास्त त्रास होता तो शाळकरी मुलांना. उन्हाळ्यामध्ये अनेक प्रवाशांना या गेटमध्ये उभे राहावे लागल्यामुळे भोवळ येऊन पडल्याचेही चित्र आहे. त्यातच दवाखान्याची अत्यावश्यक सेवा हीदेखील या बंद गेट मुळे मिळत नव्हती. या गेटमधून जमुना नगर ,जय नगर, सहकार बँक कॉलनी, विद्युत कॉलनी, श्री सरस्वती भुवन कॉलनी, नूतन वसाहत ,या रहिवासी वस्तीसह रेवगाव, बेथलम या गावातील नागरिकांना देखील  हाच मुख्य रस्ता होता.

चार वर्षांपासून भिजत घोंगडे

गेल्या पाच वर्षापूर्वी या भागातील रहिवाशांनी उड्डाणपूल करावा किंवा भुयारी मार्ग करावा अशी मागणी लावून धरली होती. याचा परिणाम म्हणून या भागातील नगरसेवकांनी देखील रेल्वेकडे ही मागणी लावून धरली आणि काही दिवसातच हा भुयारी मार्ग मंजूर झाल्याचे अभिनंदनाचे बॅनर देखील झळकले. मात्र काही दिवसातच ते काढून घेतले गेले. त्यानंतर विधानसभेच्या वेळी या भुयारी मार्गाला नगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते आणि ते पालिकेने दिले आहे असे भासवून पुन्हा एक वर्ष पुढे ढकलले. दरम्यान पावसाळा सुरू झाला आहे आणि पाणी साचल्यामुळे तिथे काम करता येत नसल्याचा एक नवीन बहाना पुढे आला आणि पुन्हा हे काम पुढे ढकलले गेले. त्यामुळे या भुयारी मार्गाचे काम होईल यावर कोणाचा विश्वासच बसेना झाला.

रेल्वे प्रशासनाने हा भुयारी मार्ग करण्याचे मंजूर केले मात्र पावसाळ्यात येथे साचलेले पाणी काढून द्यायचे कुठे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता शेवटी रेल्वे प्रशासन या निर्णयावर येऊन पोहोचले आहे की, त्यांच्या हद्दीत हा भुयारी मार्ग बांधून देणे आणि पुढील काम नगरपालिकेकडे सोपवणे . रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपेंदर सिंग यांनी आज या भुयारी मार्गाची पाहणी केली. त्यांच्यासोबत सहाय्यक विभागीय अभियंता सुधाकर, या पुलाचे काम करणारे अभियंते सुमन कुमार ,विजय कुमार, आणि लालूदास उपस्थित होते. तसेच सहाय्यक व्यवस्थापक के ओरेन आणि रंजीत कुमार पांडे यांचीही यावेळी उपस्थिती होती .

दरम्यान 22 ऑगस्ट रोजी या भूमिगत पुलाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता  या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

app-edtv jalna/web-www. edtv jalna. com. 9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button