मनोज जरांगे यांचे उपोषण मागे; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मध्यस्थी
जालना- मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या मराठा बांधवांचा कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी देऊन आर्थिक मदत मदत करू, असे आश्वासन सरकारने साष्ट पिंपळगाव येथे सुरू असलेल्या मराठा समाज बांधवांच्या साखळी उपोषणादरम्यान दिले होते. मात्र अद्याप पर्यंत ते पूर्ण न झाल्याने मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच दिवसांपासून अंबड तहसील कार्यालयासमोर पुन्हा उपोषण सुरू केले होते.
या उपोषणादरम्यान उपोषण करणारे मनोज जरांगे आणि बाळकृष्ण लेवडे यांची तब्येत खालावली. त्यामुळे त्यांना काल दिनांक दोन रोजी जालना येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते, तर उर्वरित हरीओम येवले ,सुनील शेळके, माणिक जगताप, संतोष गुजर, यांना अंबड येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दरम्यान आरोग्य मंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी आज सामान्य रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे आणि बाळकृष्ण लेवडे यांची भेट घेऊन उपोषण सोडवले.शासनाने दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी आणि कुटुंबियांना दहा लाख रुपये देण्यात येतील असे आश्वासन राज्य सरकारच्यावतीने देण्यात आले होते.
-दिलीप पोहनेरकर.9422219172