बैलांच्या सजावटीवर झाला महागाईचा परिणाम
बदनापूर -कोरोना विषाणूमुळे देशात सर्वचजण संकटात सापडले असून बैल पोळा सणावर या महामारीचे सावट पसरले आहे. बैलांची सजावट करण्यासाठी दरवर्षी बदनापूर येथील बाजारगल्लीत मोठ्या प्रमाणात दुकाने थाटुन खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असते. मात्र या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे बैलांच्या सजावटीवर परिणाम झाला आहे
ग्रामीण भागात बैल पोळा हा सण सर्वात महत्त्वाचा सण मानले जाते. या दिवशी बैलाची पूजा करून विविध पद्धतीने सजावट करून वाजत- गाजत गावातून मिरवणूक काढली जाते परंतु यंदा देशावर कोरोनाचे सावट असल्याने हा बैल पोळा सण साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. वर्षभर शेतकऱ्यांना सहाय्य करणाऱ्या बैलांना सजावट करून त्याचे धन्यवाद मानले जातात. या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची विक्री करणारे दुकाने शहरातील बाजार गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक तथा जालना-औरंगाबाद मुख्य रस्त्यावर दुकाने सजली असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे ग्राहकच दुकानात फिरकत नसल्याचे येथील दुकानदारांनी सांगितले. दरवर्षी ग्रामीण भागातून बैल सजावटीसाठीचे साहित्याला चांगली मागणी असते यंदा मात्र मागणी घटली असल्याचे चित्र आहे. दरम्यान बाजारात फेरफटका मारला असता पोळा सणावरही महागाई आल्यामुळेही शेतकऱ्यांसमोर सण साजरा करण्यासाठी अडचणी असल्याचे दिसून आले. त्यातच टोमॅटो, मिरची आदी भाजे पिकांना कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. बैलांना लागणाऱ्या साहित्याच्या भावात मागील वर्षाच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात मोरकी ८० रुपये, कासरा १८० वेसण ४०, सर १५०, कवडी माळ २०० ते २५०, मणीमाला १२० ते १५०, झूल १२०० ते १५००, बाशिंग १४० घुंगरू पट्टा सहाशे रुपये असे भाव आहेत. कोरना रोगाच्या पार्श्वभमीवर लघु उद्योग बंद असल्यामुळे माल न मिळाल्याने व जे मिळाले ते साहित्यही कमी मिळाले असल्याने भाव देखील वाढले असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.
पाण्यापासून सावध राहण्याचे आवाहन
पोळा सण जवळ आलेला असून कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून सण उत्सव साजरे करण्यास प्रशासनाने बंदी केलेली असल्याने घरीच पोळा साजरा करावा. बैलाची कोणतीही मिरवणूक काढून गर्दी करू नये. तसेच पोळा सणानिमित्त बैल खांदे मळणीसाठी बैलांना नदीकिनारी नेत असताना पाण्याचा अंदाज घेऊनच जावे, यंदा पावसामुळे नदी व नाल्यात मोठया प्रमाणात पाणी असल्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन बदनापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी केलेआहे.