ईतर उपक्रमजालना जिल्हा

बाप्पा आला माझ्या दारी; शोभा आली माझ्या घरी”!

          बाप्पा आला माझ्या दारी;

           शोभा आली माझ्या घरी”!

       असे म्हणतात की या चतुर्थीच्या दिवशीच श्री गणेश सर्व भक्तांसाठी पृथ्वीवर अवतरले. असे मानले जाते की गजमुख असलेला श्रीगणेश म्हणजे सर्व प्रकारची बुद्धीमत्ता, ऐश्वर्य आणि सौभाग्य मिळवून देणारा देव आणि शिव पार्वतीचा पुत्र आहे. श्रीगणेशाच्या या रुपामागे गहन अर्थ दडलेला आहे.

गणेश चतुर्थीच्या दिवशी विविध रूपात गणेशाची पूजा केली जाते. या मूर्ती तयार करणे ही एक अद्वितीय अशी कला आहे ज्यातून निराकारापर्यंत पोहोचता येते. गणेश स्तोत्रातही गणेशाच्या स्तुतीपर वर्णनात हेच सांगितले आहे. आपण आपल्या चेतनेतील श्री गणेशाची प्रार्थना करतो की त्याने आपल्यासमोर मूर्तीच्या रूपात यावे जेणे करुन आपण काही काळ त्याच्याशी रममाण होऊन शकू, हसत खेळत संवाद साधू शकू. ठराविक दिवसांनंतर त्यांची प्रार्थना करतो की ते जिथून आले तिथे म्हणजे आपल्या चेतनेत त्यांनी निघून जावे. आपण गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा करतो म्हणजे त्याच्याकडूनच मिळालेल्या गोष्टी आपण त्यालाच अर्पण करत असतो.ठराविक दिवसांनंतर मूर्तीचे विसर्जन केले जाते. यातून आपल्याला हे कळते की ईश्वर मूर्तीमध्ये नाही. तो तर आपल्यातच आहे. अशा प्रकारे सर्वव्यापी असलेल्या ईश्वराला साकार रुपात अनुभवणे आणि त्याचा आनंद घेणे हीच गणेश चतुर्थी मागची मूळ भावना आहे.

गणेश चतुर्थी म्हणजे उत्सव आणि पूजा तसेच उत्साह आणि भक्तीचा समन्वय आहे. श्री गणेश हा आपल्यातील अनेक चांगल्या गुणांचा देव आहे. आपण जेंव्हा त्याची पूजा करतो तेंव्हा ते गुण आपल्यातही खुलू लागतात. जिथे जडता असेल तिथे ना ज्ञान असते ना बुद्धी असते ना प्रगती. त्यामुळे चेतनेला जागृत करणे आणि चेतनेचा अधिकार जाणणे म्हणजेच गणेश आहे. आपल्यातील हीच चेतना जागृत व्हावी म्हणूनच प्रत्येक पूजेच्या आधी गणेशाची पूजा केली जाते.अशाप्रकारे मूर्तीची स्थापना करून प्रेमाने पूजा करण्याने आणि त्याचे ध्यान करण्याने आपल्याला आपल्यात गणेशाचा अनुभव घेता येतो. आपल्यातील गणेश तत्वाला जागृत करणे हीच गणेश चतुर्थी मागची खरी भावना आहे.

घरोघरी आणि मंडपोमंडपी येणारा हा बाप्पा येतांना सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण घेउन येतो. त्याच्या आगमनापुर्वीपासुनच कितीतरी दिवस आधीपासुन तयारी सुरू होते. प्रत्येक जण आपल्या पंरपंरेप्रमाणे त्याची पुजा अर्चना करतात.कुठे बाप्पा संपुर्ण दहा दिवस, कुठे पाच दिवस, कुठे दिड दिवस तर कुठे अगदी एक दिवसाकरीता देखील येतो. श्री गणरायाची मुर्ती ही मातीचीच असावी असा नियम आहे. शक्यतो शाडु मातीची मुर्ती बसवावी किंवा काळया मातीची देखील मुर्ती चालेल परंतु आजकाल सुबक आणि रेखीव म्हणुन प्लॅस्टर ऑफ पॅरीस च्या मुर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा जो प्रघात पडला आहे तो पर्यावरणाकरता हानिकारक असल्याने आपण मातिच्याच मुर्तीचा आग्रह धरावा

.श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतांना पार्थिव मुर्तीचे आवाहन, पुजन, अभिषेक, अत्तर फुलं दुर्वा पत्री अर्पण करून अखेर नैवेद्य आणि आरती अशी प्रथा आहे.गणपतीला सर्वात प्रिय असणारा नैवेद्य म्हणजे मोदक. गणपतीला 11 किंवा 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो.गणपतीची पूजा करताना नेहमी दुर्वांची जुडी वाहिली जाते. कारण बाप्पाला दुर्वा फारच प्रिय आहेत आणि त्यामुळे गणपती प्रसन्न होतो. गणपतीला नेहमी 21 दुर्वांची जुडी प्रामुख्याने वाहिली जाते.दुर्वांप्रमाणेच गणपतीला प्रिय आहे ते जास्वंदाचं लाल फूल. कारण गणपतीचा वर्ण शेंदरी किंवा लाल आहे. त्यामुळे गणपती पूजेत जास्वंदाच्या लाल फुलाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे गणपतीला जास्वंदीच्या फुलांचा हार प्रामुख्याने वाहिला जातो.महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. पेशव्यांच्या काळापासून गणेशोत्सव घरगुती उत्सवाच्या स्वरूपात साजरा करत असल्याचे उल्लेख आहेत. लोकमान्य टिळकांनी ब्रिटीशांच्या काळात समाजातील एकी वाढण्याकरिता या उत्सवाला सार्वजनिक स्वरुप दिले. तेव्हापासून गणेशोत्सव हा घरगुती आणि सार्वजनिकरित्या साजरा केला जातो. महाराष्ट्रासोबतच भारतातही या गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव साजरा केला जातो.

कु .किर्ती राजेंद्र वाणी,औरंगाबाद

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button