18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर
1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोविड चे लसीकरण सुरू होणार आहे. परंतु लस उपलब्ध नसल्यामुळे हे लसीकरण लांबण्याच्या मार्गावर असल्याचे सुतोवाच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.जालना शहरातील महाराजा अग्रसेन फाउंडेशनच्या सुसज्ज इमारती मध्ये आज दिनांक 25 रोजी जम्बो कोविड सेंटरचे उद्घाटन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
110 खाटांचे हे सेंटर असणार आहे. या सेंटर मध्ये सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णावर उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी ऑक्सिजन, परिचारिका, डॉक्टर, ही सर्व यंत्रणा वेगळी कार्यान्वित करण्यात आली आहे. दरम्यान 1 तारखे पासून सुरु होणारे 18 वर्षापुढील नागरिकांसाठी चे लसीकरण लसी अभावी लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असेही टोपे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, सिरम इन्स्टिट्यूट ची कोवीशील्ड ही लस 20 मे पर्यंत जेवढी उत्पादन होणार आहे ती केंद्राकडे दिल्या जाणार आहे. कारण 45 वर्षे वयोगटातील पुढील नागरिकांना तिचा वापर होणार आहे .त्यामुळे ही लस महाराष्ट्राला मिळणे अवघड आहे. परंतु पर्यायी मार्ग शोधल्या जात असल्याचेही ते म्हणाले.
या उद्घाटन प्रसंगी आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे ,जिल्हा शल्य चिकित्सक अर्चना भोसले, आदींची उपस्थिती होती.