महिला अधिकारी पण” सामान्य”
जालना- शासकीय कर्मचारी कुठलाही असो शिपायापासून ते वरिष्ठ श्रेणी एक पर्यंतच्या शासकीय कर्मचाऱ्यांची वर्तणूक ही सामान्य माणसापेक्षा थोडी वेगळीच असते. महिला असल्यावर तर पाहायलाच नको! मात्र ही परिस्थिती कुठेतरी खोटी ठरवणारे चित्र आज जालन्यात महिला अधिकाऱ्यांकडून पाहायला मिळालं.
निमित्त होतं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं. त्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्याचं. आज 17 सप्टेंबर त्यानिमित्त जालना शहरातील हुतात्मा स्मारकात अभिवादन आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमाला शासकीय कर्मचारी उपस्थित होतेच, त्यामध्ये महिला अधिकारीही उपस्थित होत्या. त्यामध्ये अंजली कानडे (उपजिल्हाधिकारी पुनर्वसन) रीना बसय्ये (जिल्हा पुरवठा अधिकारी) आणि शर्मिला भोसले (उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन) अभिवादनाचा कार्यक्रम संपला आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सुमारे 80 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक श्रीमती कौशल्याबाई तुकाराम खरात या परत जायला निघाल्या. अभिवादन करण्यासाठी त्या एकट्याच आल्या होत्या आणि परत जाताना देखील त्या एकट्याच होत्या. मात्र वयोमानानुसार त्यांना रिक्षा पर्यंत जाणे थोडे कठीण झाले होते. त्यामध्ये अभिवादनासाठी आलेल्या पाहुण्यांच्या गर्दीची भर पडली. आजीबाईंची ही अडचण लक्षात घेऊन अंजली कानडे यांनी आजीबाईंचा हात धरला आणि या गर्दीतून वाट काढली. फक्त वाटच नाही काढली तर त्यांना मुख्य रस्त्यावर येऊन रिक्षातही बसवून दिले. अर्थातच अंजली कानडे यांच्या समवेत रीना बसय्ये आणि शर्मिला भोसले या दोघी होत्या. जोपर्यंत आजीबाईंचा रिक्षा मार्गस्थ होत नाही तोपर्यंत या तिघींनी देखील त्यांच्या वाहनात प्रवेश केला नाही. महिला अधिकाऱ्यांचे हे सामान्य रूप क्वचितच पाहायला मिळतं. आणि त्यामध्ये ही अशा वरिष्ठ पातळीवर अधिकारी महिला जर सामान्यांच्या मदतीला जर धावून आल्या तर जनतेसाठी ही एक आश्चर्याची बाब ठरते.
-दिलीप पोहनेरकर,9422219172