जालना जिल्हा

महिन्याभराच्या अथक परिश्रमानंतर घरातच उभं केलं पंढरपूर

जालना-आपल्या प्रियजनांच्या भेटीची जर ओढ लागली तर एखादा माणूस काय करू शकतो त्याचं उदाहरण जालन्यात पाहायला मिळालं! तो प्रियजन माणूस असो अथवा देव तो विषयच नाही. मात्र त्याला भेटण्यासाठी आपल्याला जाता येत नसेल तर त्याला आपल्या घरी बोलण्याची शक्ती एखाद्याच्या भक्तीमध्ये असते आणि ही भक्ती बाजिउम्रद येथील ज्ञानेश्वर पांडुरंग डोंगरे यांच्या घरी पाहायला मिळाली.

सध्या ते जालन्यातील म्हाडा कॉलनी येथे राहतात. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना पंढरीलाआषाढी वारीला जायला मिळाले नाही, त्यामुळे त्यांनी पूर्ण पंढरपूरच आपल्या घरी उभे केलं आहे. गणपती बाप्पांच्या आगमनानिमित्त त्यांनी आपल्या घरी हा देखावा केला आहे . थोडाथोडका नव्हे तर पूर्ण खोलीभर केलेला हा देखावा डोळ्यासमोर पंढरपूर उभा करतो. चंद्रभागेचे वाहणारे झुळझुळ पाणी या गंगेवर बांधलेला पूल आणि पुलावरून वाहणाऱ्या वाहनांपासून ते बाहेरगावाहून आलेल्या विविध दिंड्या कुठल्या मठात थांबतात, त्यांचे प्रमुख कोण आहेत, कोणकोणत्या दिंड्या आहेत, हे सर्व बारकावे या देखाव्यांमध्ये टिपले आहेत. दिंड्यांमध्ये ज्या प्रमुख दिंड्या आहेत त्या संत गजानन महाराज शेगाव, श्री. भक्त पुंडलिक मंदिर चंद्रभागा, संत मुक्ताई, संत तुकाराम महाराज देहूगाव, संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी, अशा अनेक दिंड्यांचे देखावे इथे पाहायला मिळतात. या दिंड्या जिथे थांबतात त्या मठाची त्या वाड्याची प्रतिकृती आणि त्या समोर ज्यांच्या नावाने ही दिंडी आहे त्यांची छोटीशी मूर्ती हे त्या ठिकाणाचे महत्त्व विशद करते .


वारीमध्ये आपले श्रद्धास्थान ज्या पालखीमध्ये असते ती पालखी, बैलगाडी च्या माध्यमातून हळूहळू पुढे सरकत असताना सजवलेली बैलगाडी आणि बैलगाडीत विराजमान असलेल्या पादुका देखीलआपण क्षणभर पंढरपुरात असल्याचे आभास निर्माण करतात. एकादशी झाल्यानंतर काल्याच्या कीर्तनाने आषाढी एकादशी सोहळा समाप्त होतो. हा आषाढी एकादशीचा सोहळा देखील इथे पाहायला मिळतो .

ज्ञानेश्वर पांडुरंग डोंगरे यांच्या घरी गेल्या अनेक पिढ्यांची पंढरपूरला जाण्याची परंपरा आहे. मात्र दोन वर्षांपासून कोरोनामुळे त्यांना जाता येत नव्हते आणि जीवाची घुसमट होत होती. त्यामधून त्यांच्या पत्नी सौ. चंद्रकला ज्ञानेश्वर डोंगरे यांनी हा देखावा साकारला आहे. अर्थातच एक महिनाभर या देखाव्याची तयारी सुरू होती आणि या तयारीला हातभार लावला तो भागवत डोंगरे,तुकाराम एकनाथ डोंगरे, शिवाजी क्षीरसागर, परमेश्वर शिंदे, सविता क्षीरसागर ,सौ.पूजा भागवत डोंगरे आणि परिवारातील सर्वात लहान वारकरी वेदांत भागवत डोंगरे यांनी.

-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button