Jalna District

परतूर तालुक्यात बस पडली नदीमधे

जालना- परतूर तालुक्यातील सृष्टी गावच्या बाजूला असलेल्या पुलावरून बस जात असताना चालकाला पुलाचा अंदाज न आल्याने बस नदीत पडल्याची घटना आज दिनांक 23 रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली.

 

रात्रीची वेळ असल्यामुळे मदत कार्याला अडचण आली आहे परंतु श्रीष्ठीच्या गावकऱ्यांनी जीवाची बाजी लावून या बसमधील सुमारे 42 प्रवाशांना वाचविण्यात यश मिळविले आहे. आज सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास परतूर डेपोची बस क्रमांक एम एच 21- 22 80 ही परतुर -आष्टी कडे जाऊ लागली. पुलावरुन पाणी वाहत असल्यामुळे चालकाने ही बस अलीकडेच थांबविली मात्र काही प्रवाशांनी आणि कांहीउपस्थितांनी ही बस पुलावरून घालण्यास भाग पाडले आणि नेमके या वेळी गावकरी देखील आपापल्या घरी आलेले होते. बस पुढे जात असतानाच अर्ध्या नदीत गेल्यावर चालकाला फुलाचा अंदाज आला नाही, आणि बस नदीच्या खाली पडली एका अंगावर बस पडल्यामुळे फक्त एकच बाजू दिसत होती. या पुलाच्या बाजूला रस्त्यावर बस स्थानक आहे आणि येथील चहाचे दुकान, पानाची टपरी आणि अन्य काही गावकऱ्यांनी ताबडतोब धाव घेतली आणि क्षणार्धामध्ये सर्व गाव मदतीसाठी धावून आले. या मदत कार्यामध्ये राजेश अंभोरे, सर्जेराव अंभोरे, योगेश नवल, आसिफ शेख, यांची प्रामुख्याने मदत झाली. बसमध्ये 40 ते 45 प्रवासी होते त्यापैकी 42 प्रवासी सुखरूप बाहेर काढण्यात आले. बस वाहून जात असल्यामुळे काही गावकऱ्यांनी दोरीच्या मदतीने बसला बांधून ठेवले आणि बसच्या काचा फोडून आत मधील प्रवाशांना बाहेर काढले. हे होत असतानाच बस मधून एक चार- पाच वर्षाची मुलगी बाहेर पडली आणि पाण्यामध्ये वाहून जाऊ लागली या मदत कार्यामध्ये सहभागी असलेले सिद्धेश्वर अंभोरे यांनी या मुलीला पाहिले आणि पोहत जाऊन तिचा जीव वाचवला. या गावांमधील सुमारे 70 टक्के लोकांना नदीमध्ये पोहण्याची सवय आहे आणि त्यांना पोहता येते. त्याचा देखील फायदा आज या भीषण संकटामध्ये झाला आहे .दरम्यान परतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठावळे यांनी देखील घटनास्थळाकडे धाव घेतलीआहे.

-दिलीप पोहनेरकर, edtv 9422219172

Related Articles