त्या “अंगणवाडी सेविकेवर दोन दिवसानंतर कारवाई
जालना -परतूर तालुक्यातील शेलगाव येथील अंगणवाडी कार्यकर्त्या कांताबाई परसराम साठे यांनी शालेय पोषण आहाराचा तांदूळ भंगार वाल्यांना विकला होता. गावकऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडून दिले होते, मात्र अजूनही या सेविकेवर काहीच कारवाई न झाल्याने जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल लोणीकर यांनी या कारवाई विषयी विचारणा केली असता पुढील दोन दिवसांमध्ये या महिलेवर कारवाई केली जाईल अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संगीता लोंढे यांनी सभागृहात दिली.
जालना जिल्हा परिषदेच्या सभागृहांमध्ये आज स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी लोणीकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला. शेलगाव येथील अंगणवाडी 1 च्या सेविका यांनी दिनांक 27 जुलै रोजी शालेय पोषण आहाराचा तांदूळ भंगारवाल्याला विकला होता .हा तांदूळ विकत असतांना गावकऱ्यांनी रंगेहात पकडले ही होते मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यास संबंधित विभाग टाळाटाळ करीत होता .घडलेल्या सर्व प्रकाराचा पंचनामा ही झाला होता आणि या प्रकरणाची तक्रार प्रकल्प अधिकारी यांना दिल्यानंतर दिनांक 29 जुलै रोजी या सेविकेची चौकशी झाली होती. भंगारवाल्याला तांदूळ विकल्यानंतर उर्वरित तांदळाचा मोठा साठा शिल्लक होता .यासाठ याबद्दल श्रीमती साठे यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्य राहुल लोणीकर यांनी आज सभागृहात हा विषय ताणून धरला .त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी हस्तक्षेप करत ,संबंधित महिलेचा खुलासा आजच माझ्याकडे आला आहे आणि दोन दिवसात त्यावर निर्णय घेतला जाईल असे सांगितले .दरम्यान संगीता लोंढे यांनीदेखील या महिलेला संधी देणे आवश्यक होते, त्यामुळे कारवाईला विलंब झाला आहे मात्र येत्या दोन दिवसात या महिलेच्या खुलाशावर निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे. त्यामुळे शालेय पोषण आहाराचा तांदूळ भंगारवाल्याला विकताना पकडलेल्या या अंगणवाडी सेवीकेवर काय कारवाई होते हे पाहण्यासाठी आणखी दोन दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे .
-दिलीप पोहनेरकर,9422219172