Jalna Districtजालना जिल्हा

धरणावर पर्यटकांसोबतच स्टंटबाज वाढले

बदनापूर –  मुसळधार पावसाची बॅटींग झाली आहे.  नद्या नाल्यांना पूरसदृश परिस्थिती असताना व अनेक ठिकाणी बुडून होणाऱ्या दुर्घटना ताज्या असताना तरूणांच्या स्टंटबाजीला मात्र लगाम बसतच नसल्याचे चित्र आहे.  तालुक्यातील सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्पाच्या सांडव्यावर असे स्टंटबाज दिसून येत असून दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.

बदनापूर तालुक्यातील सर्वात मोठा व जुना प्रकल्प म्हणून सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्प ओळखला जातो. या जलाशयात मोठा साठा असून प्रकल्प पूर्णपणे भरू वाहत आहे. प्रकल्पाच्या सांडव्याची व नदीपात्राची उंची जवळपास 18 ते 22 फूट उंच असून या सांडव्यावरून  फेसाळत वाहणारे पाणी पर्यटकांना आकर्षित करत आहे. सोमठाणा येथेच डोंगराच्या माथ्यावर रेणुका माता मंदिर असल्यामुळे भाविकांबरोबरच पर्यटकांची मोठी गर्दी येथे दिसून येते. सध्या दुधना नदीच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस पडल्यामुळे दुधना नदीला पूर आलेला आहे त्यामुळे जोरदार वाहणाऱ्या या सांडव्याकडे सर्वसाधारण नागरिक आकर्षित होणे साहजिक असतानाच काही हौसे-गौसे येथे धिंगाणा घालतानाही आढळून येत आहे. मोठया गटाने ते प्रकल्पावर येऊन स्टंटबाजी करत आहेत.

प्रचंड वेगाने पाणी वाहणाऱ्या सांडव्यावरून काही तरूण स्टंटबाजी करत आहेत. सध्या सर्वच नदी नाल्यासह प्रकल्पात मुबलक पाणी साठा असून अनेक ठिकाणी अशा प्रकारामुळे बुडून, वाहून जावून जिवीतहानीच्या घटना घडत असताना या ठिकाणी मात्र काही स्टंटबाजांमुळे दुर्घना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे व सर्वसामान्य पर्यटकांनाही या स्टंटबाजांचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी चौकीदार नियुक्त करण्याची मागणी होत असून पोलिसांनीही आगामी नवरात्रोत्सवामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन येथे बंदोबस्त लावण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

-edtv news,9422219172

Related Articles