Jalna District

रुग्णवाहिका थेट पोलीस ठाण्यात

जालना- रुग्णवाहिका येण्यास उशिर झाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला, असा आरोप करत रुग्णवाहिका थेट पोलीस ठाण्यात नेऊन रुग्णवाहिका चालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी केली.
आज सकाळी दहा वाजता जालना शहरातील डायलिसिस चे रुग्ण राजू मदारे 38, हे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती झाले होते. त्यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर डॉक्टरांनी दुपारी दोन वाजेच्या सुमारास या रुग्णाला औरंगाबाद येथे हलविण्यास सांगितले. त्यानुसार रुग्णाचे नातेवाईक लखन मदारे यांनी ४ वाजता १०८ नंबर लावून रुग्णवाहिका बोलावली. चार वाजता बोलावलेली रुग्णवाहिका ६ वाजता आली आणि त्या दरम्यान राजू मदारे यांचा मृत्यू झाला. रुग्णवाहिका उशिरा आल्यामुळेच आपल्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत लखन मदारे आणि त्यांचे मित्र अमोल मिसाळ, आर. आर. पाटोळे, आकाश घाटोळे, यांनी रुग्णवाहिकेसह हा मृतदेह कदीम जालना पोलिस ठाण्यात नेला, आणि रुग्णवाहिका उशिरा आल्यामुळेच नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे रुग्णवाहिका चालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करू लागले. मात्र पोलिसांनी यासंदर्भातील तक्रार आरोग्य विभागाकडे करावी लागेल असे सांगून या नातेवाईकांची समजूत काढून रुग्णवाहिका रवाना केली.
दरम्यान या आरोपा संदर्भात 108 या रुग्णवाहिकेचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. भानुसे यांनी सांगितले की जिल्ह्यात एकूण 15 रुग्णवाहिका कार्यरत आहेत, त्यापैकी दोन रुग्णवाहिका अपघातग्रस्त असल्यामुळे प्रत्यक्षात १३ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. संबंधित रुग्णांचा फोन आल्यानंतर जवळपास कुठली रुग्णवाहिका उपलब्ध आहे याचा तपास घेतला असता फक्त आंबड उपजिल्हा रुग्णालयात एक रुग्णवाहिका उभी आहे असे समजले, परंतु या रुग्णवाहिके सोबत दिल्या जाणारे डॉक्टर हे आजारी असल्यामुळे दुसऱ्या डॉक्टरची व्यवस्था करण्यामध्ये अर्धा तास गेला. डॉक्टर शिवाय रुग्णवाहिका देता येत नाही. आणि त्यानंतर डॉक्टरसह ही रुग्णवाहिका जालना येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आली. रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या मागणीनुसार रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे . जिल्ह्यातील इतर रुग्णवाहिका इतर रुग्ण घेऊन इतरत्र गेल्यामुळे फक्त एकच रुग्णवाहिका होती, आणि सर्वतोपरी रुग्णांना रुग्णसेवा पुरविण्याचे काम केल्या गेले आहे.
-दिलीप पोहनेरकर, ९४२२२१९१७२

Related Articles