बनावट बायोडिझेल चा जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल. 58 लाखांचा मुद्देमाल जप्त.
जालना -गेल्या अनेक महिन्यांपासून जालना जिल्ह्यामध्ये बनावट बायोडिझेल विक्रीचा सपाटा सुरू होता. विशेष करून ग्रामीण भागात ही विक्री जास्त होती . त्यापाठोपाठ जालना -औरंगाबाद रस्त्यावर देखील चंदंनजिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पंपावर रात्री-बेरात्री अशा प्रकारचे बायोडिझेल विकले जात होते. मात्र पुरवठा विभागाला पुरावे सापडत नव्हते . हे पुरावे मिळविण्याचा अनुषंगाने पुरवठा विभागाने पुरावे जमा करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आणि काल दिनांक 5 रोजी दोन आरोपींसह 58 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बनावट बायोडिझेल बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची जालना जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी रीना बसय्ये यांना गुप्त माहिती दाराने माहिती सांगितली, त्या माहितीनुसार श्रीमती बसय्ये यांनी जालना जालना तहसीलच्या पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार मंगला मधुकर मोरे यांच्यासह प्रभारी तहसीलदार तुषार निकम, चिंतामण मिरासे ,जी. एस. मोरे, अनिल पाटील, यांच्या पथकासह मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास चंदंनजिरा परिसरात असलेल्या विकास शॉपिंग कॉम्प्लेक्स पाठीमागे एका गोदामावर छापा मारला. यावेळी तिथे एम. एच. ४६ ए .आर. ८१०९( किंमत २२ लाख), एम.एच.२०-इएल-५४८९,(८लाख रुपये),एम.एच.०४एफ एल३२०२(८लाख) हे तीन टॅंकर उभे असल्याचे दिसले. टॅंकर मधील साहित्याविषयी विचारणा करून कागदपत्रे मागितली असता टॅंकर चे मालक शेख नसीर शेख मिया, 48 राहणार गीतांजली कॉलनी जालना. यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर तिथेच असलेला टँकर चालक नवनाथ शंकर गोल्हार राहणार राहतवाला तालुका आष्टी, जिल्हा बीड. याला या साहित्याविषयी विचारणा केली असता त्याने बायोडिझेल असल्याचे सांगितले. 20 लाख रुपयांचे 25 हजार लिटर बायोडिझेल आणि 38 लाख रुपयांचे तीन टँकर असा एकूण 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये जालना तहसीलच्या नायब तहसीलदार मंगला मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील दोन आरोपींविरुद्ध चंदंनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-दिलीप पोहनेरकर, edtv news
९४२२२१९१७२