Jalna DistrictRanraginiSerials

जन्मापासूनच स्त्री कणखर, तिने स्वतःची शक्ती ओळखावी -डॉ. अर्चना भोसले

जालना-जन्मापासूनच स्त्री कणखर आहे तिने आपल्या अंगातील निसर्गताच मिळालेली शक्ती ओळखून तिचा उपयोग केला पाहिजे. असे आवाहन जालन्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक आणि नवरात्रोत्सवाच्या पहिला माळेच्या ईडी न्यूज च्या पहिल्या रणरागिनी डॉ. अर्चना भोसले यांनी केले.

बीड जिल्ह्यातील शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक,सामाजिक क्षेत्राचा वारसा असलेल्या अंबाजोगाई या गावी त्यांचा जन्म झाला. सहाजिकच अशा विविधतेने नटलेल्या गावात जन्म झाल्यामुळे नकळत त्यांच्यावर धार्मिक संस्कार झाले.योगेश्वरी देवीचे भव्यदिव्य मंदिर, आद्यकवी मुकुंदराज स्वामी, स्वामी रामानंद, यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि म्हणूनच कि काय आशिया खंडातील सर्वात पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे आहे.

अशा या गावामध्ये डॉ. भोसले यांचा जन्म झाला,बालपण गेले आणि शिक्षणही झाले. गणिताची आवड असलेल्या डॉ. भोसले यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्र खुणावू लागले मात्र घरच्या जेष्ठ मंडळीं समोर त्यांची डाळ शिजली नाही. वैद्यकीय क्षेत्र हे महिलांसाठी चांगलं आहे असा घरच्यांचा आग्रह होता, त्यामुळे गणिताची आवड असतानाही अभियांत्रिकी क्षेत्र सोडून वैद्यकीय क्षेत्राकडे त्या वळल्या. काळानुरूप व्यवसाय करत असताना सेवा देत असताना स्वतःच्या आवडीनिवडी आपसूकच बाजूला पडल्या, आणि जबाबदारी अंगावर आली. पहिल्यांदाच जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून जालन्यात त्यांनी दोनवर्षांपूर्वी पदभार घेतला. आणि त्या सोबतच त्यांच्यावर जबाबदारी पडली ती जालना जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्याची.

सगळ्या जगाला या आजाराने त्रस्त केलेले असताना जिल्ह्यातील रुग्ण हा आजारातून बाहेर काढायचा कसा? या ध्येयाने सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी जालना जिल्ह्यातील कोरोना ला पळून लावण्यात यश मिळविले. नवरात्र उत्सवा बद्दल बोलताना त्या म्हणतात, कामाच्या जबाबदारीमुळे आता पूर्वीसारखं जत्रेत जाणं तो आनंदोत्सव साजरा करणे शक्य होत नाही. परंतु माझं क्षेत्र सेवा कार्य करणारे क्षेत्र आहे. त्यामुळे रुग्ण सेवेतच मला आनंद मिळतो. या कामात मदत करण्यासाठी, हिम्मत देण्यासाठी, धीर देण्यासाठी, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचा मोलाचा वाटा असल्याचेही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. खरंतर महिला ही जन्मापासूनच कणखर आहे. वैज्ञानिक विचार केला तरीही मुदतीपूर्वी एखादी महिला प्रसूत झाली आणि पुरुष जातीच बाळ जन्माला आलं तर ते जगण्याची शक्यता फार कमी असते, मात्र त्याच ठिकाणी स्त्री जातीच्या बाळाचा जन्म झाला तर ते जगण्याची शक्यता वाढते, आणि तेथुनच सुरु होतो तिचा कणखर बाणा. पुढे आलेल्या सर्व संकटांना तोंड देत ती नंतर स्वतःच्या पायावर उभी राहते, विवाहानंतर पतीच्या घरच्यांना सोबत घेते, त्यानंतर आपल्या मुलांसोबत कणखरपणे ही ती उभी राहते, तिने स्वतः मध्ये जन्मजातच असलेला हा कणखरपणा ओळखला पाहिजे, आपण स्वतः दुर्गेचे रूप आहोत हे तिनं समजलं पाहिजे आणि त्याचा उपयोग स्वतःसाठी करत इतरांसाठीही केला पाहिजे असं मतही डॉ. अर्चना भोसले यांनी व्यक्त केला. दरम्यान हे सर्व करत असतानाच आपल्या आवडीनिवडी छंद बाजूला पडू देऊ नयेत हे देखील त्यांनी आवर्जून सांगितलं.

ताण तणाव दूर करण्यासाठी आणि कामांमध्ये पुन्हा उत्साह वाढविण्यासाठी छंद जोपासले पाहिजेत, त्यामुळे मनावरील ताण तणाव कमी होतो असे सांगून स्वतः पोहण्याचे प्रशिक्षण घेऊन स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि विजेतेपदही पटकावलं! बोलता- बोलता त्यांनी स्वतःबद्दलच एक गुपितही सांगून टाकलं, आणि ते म्हणजे” मी बाथरूम सिंगर आहे” अर्थातच सिंगर,गायक आहे म्हटल्यावर गाणं तर म्हणावंच लागणार! गानकोकिळा लता मंगेशकर यांचा नुकताच वाढदिवस झाला आणि त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी त्यांनी एक गाणं म्हटलं. ते आहे ,”अजीब दास्ता है ये ,
ये मंजिले है कोनसी, कहा शुरु कहा खतम” तर अशा या रणरागिनी ला ई डी न्यूज जालन्याचा मानाचा मुजरा. आणि नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
– दिलीप पोहनेरकर,
edtv news,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button