मुलाखतीमध्ये करावा लागला अपयशाचा सामना; तरीही मिळवली नोकरी
जालना -महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 2012 ला महाराष्ट्रातून प्रथम आलेल्या मुलीला देखील अनेक वेळा अपयशाचा सामना करावा लागला.या अपयशामुळे खचून न जाता 2015 मध्ये सहाय्यक वनसंरक्षक या पदावर नियुक्ती मिळविलीच, या ध्येयापर्यंत पोहोचविण्यासाठी कारणीभूत होते ते शाळेतील मित्र मैत्रिणी आणि शिक्षक. शाळेत शिक्षण घेत असताना “बाल कलेक्टर” म्हणून हरभऱ्याच्या झाडावर चढविल्या मुळे , त्यांच्या इच्छेखातर का होईना पुढील शिक्षण पूर्ण करावे लागले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. आणि ती पासही झाली मात्र पाहिजे ती नोकरी मिळेना, हातात काही नव्हतं म्हणून या पदावर नोकरी स्वीकारली आणि आज सक्षम पणे वनविभागाचा पदभार त्या सांभाळत आहेत. त्या आहेत रणरागिनी सौ. पुष्पा परसराम पवार ,सहाय्यक वनसंरक्षक जालना. सध्या त्यांच्याकडे सिल्लोड सोयगाव अजिंठा येथील देखील अतिरिक्त पदभार आहे.
मूळच्या परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील रहिवासी असलेल्या पुष्पा परसराम पवार यांनी ई. डी.( इलेक्ट्रॉनिक डिजिटल) टीव्ही ला नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रणरागिनी या मालिकेसाठी खास मुलाखत दिली.
पुष्पा पवार यांचे वडील शिक्षक, त्यामुळे घरात शैक्षणिक वातावरण होते, आणि शिक्षणाची आवड असल्यामुळे नियमित शाळेत जाणे आणि अभ्यास करणे हे तर होतेच. त्याच वेळी शाळेत शिकत असताना मित्र मैत्रिणी आणि त्यांच्यासोबत शिक्षक देखील “बाल कलेक्टर” म्हणून त्यांना चिडवत होते. त्यामुळे त्यावेळी हरभराच्या झाडावर चढल्यामुळे या देखील फुशारकी मारत बाल कलेक्टर म्हणून मिरवायच्या. शिक्षण झाल्यानंतर 2012 मध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि या परीक्षेत त्या महाराष्ट्रातून पहिल्या आल्या, आणि त्यानंतर सुरू झाला तो नोकरीचा शोध.
लेखी परीक्षेत पास होणाऱ्या पुष्पा यांना शारीरिक चाचणी मध्ये मात्र अपयशाला तोंड द्यावे लागायचे, कदाचित त्यावेळची त्यांची शरीरयष्टी म्हणजे काटकुळी आणि बाटूक असलेली मुलगी. त्यामुळे प्रशासनाचा डोलारा ती सांभाळू शकेल का ?असा प्रश्न कदाचित मुलाखतकारांना पडला असावा, म्हणून त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. परंतू जिद्द न सोडता शेवटी 2015 मध्ये सहाय्यक वनसंरक्षक या पदावर त्यांची नियुक्ती झाली. हातात कुठलीच नोकरी नव्हती म्हणून बळजबरीने सुरू केलेली ही नोकरी, आता मात्र या विभागा सारखी नोकरी कुठेच मिळत नाही असे देखील त्या अभिमानाने सांगतात. कारण वनविभाग म्हटले की निसर्ग आला, आणि या निसर्गाच्या सानिध्यात 24तास राहायला मिळतं. याचा त्यांना आनंद आहे. वन विभागाची नोकरी करीत असताना वन सांभाळणे आणि वाढवणे ही तर जबाबदारी आहेच, त्यासोबतच आणखी काही जबाबदाऱ्या आहेत त्यामध्ये ठळक म्हणजे वन्य प्राण्यांचे रक्षण झाले पाहिजे, विहिरीत पडलेले जंगली प्राणी बाहेर काढणे बिबट्याच्या शोधात जाणे, अशा प्रकारच्या जीवावर बेतणाऱ्या मोहीम देखील पार पाडाव्या लागतात. जंगल वाढविण्यासाठी आणि जनतेला निसर्गाच्या सानिध्यात ओढून झाडांना जीव लावण्यासाठी विविध उपक्रम राबवावे लागतात. त्यातीलच महिलांनी महिलांसाठी राबवलेले उपक्रम म्हणजे वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने महिलांना देण्यात येणाऱ्या वडाच्या , बेलाच्या रोपांची भेटी. या माध्यमातून महिलांना वृक्षारोपणाची आवड निर्माण करण्यासाठी देखील प्रयत्न केला जातो. कारण या दोन्ही झाडांना वैज्ञानिक महत्त्व तर आहेच त्यासोबत धार्मिक सांगड घातलेली आहे.
अनेक वेळा वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी शेतामध्ये जंगलामध्ये फिरावे लागते अशावेळी वन अधिकाऱ्यांसोबत बघ्यांची,ग्रामस्थांची संख्या मोठी असते, या संख्येमुळे हे वन्य प्राणी चिडून हल्ला करण्याचीही जास्त शक्यता असते .त्यामुळे अशा नागरिकांनी स्वतःला आळा घालावा आणि गर्दी करू नये आणि वन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दिलीप पोहनेरकर,edtv news,9422219172