श्री जडाची आई देवस्थान

श्री जडाची आई देवस्था
श्री गडाची आई हे देवस्थान जालन्याच्या पूर्वेस जालना रोहनवाडी हिस्वन या रस्त्यावर १० कि.मी. च्या अंतरावर रेवगांवच्या जवळ आहे. आजूबाजूचा रम्य परिसर बाजूला पाण्याचे तळे हिरवीगार शेती अशा सृष्टी सौंदर्याने नटलेल्या भागात श्री जडाची आईचे वास्तव्य आहे.
जडाची देवीचा पूर्व इतिहास असा आहे की, कसबा येथील प्रसिद्ध जड घराण्याचे आजच्या १४ व्या पिढीतील पुरुष प पु. बाबाजी जड हे परमदेवी भक्त होते. दरवर्षी श्री. रेणुका माता माहुर येथे यात्रा पायी करण्याचा नेम होता. पुढे वयोमानाचा परिणाम शरीरावर झाल्यावर पायी प्रवास होईना तेंव्हा श्री. रेणुका आईची करुणा भाकली प्रार्थना केली आईच्या जवळ लेकराने हट्ट धरला की आई मी तुझ्या दर्शना शिवाय राहू शकत नाही, तरी तू कृपा करून माझ्या जालना येथील घरी वास्तव्याला चल. भक्तिभाव, अनन्यता पाहून श्री रेणुका आई प्रसन्न झाली आणि सांगितले मी तुझ्या घरी येते पण तू मागे पाहू नकोस मी तुझ्या मागेच आहे. श्री बाबाजीला फार आनंद झाला आनंद झाला, डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले अश्रुनी चरणावर अभिषेक झाला. आईने बाळाला आशीर्वाद दिला आणि माय लेकराची यात्रा सुरू झाली. श्री. बाबाजीच्या पायांत गती आली आनंद, प्रेम, भक्ती या भावनांना उधाण आला आज आदिमाता,जगतजनी, परशुरामाची आई, माहूरगड सोडून भक्ताच्या मागे चालत होती.
हाके सरसी घाई घाई
वेगळे धावतची पायी
आली तापल्या उन्हात
नाही आळस मनांत // माझी रेणुका माऊली//
पुढे श्री. बाबाजी मागे आईसाहेब आता प्रवास संपणार, माझ्या घरात मी आईचा पाहुणचार करणार तिची अखंड सेवा मला घडणार आणि माझ्या नरदेहाचा सार्थक होणार या आनंदात मनात अनेक मनोराज्य करीत चालणाऱ्या श्री. बाबाजीच्या मनात विचार आला. आई थकली असेल काट्याकुट्यातून पायी चालताना कोमल पावलांना त्रास होत असेल, मी कसा मुलगा आईची निघाल्या पासून काहीच विचारपूस केली नाही, अतिशय अपराधी असल्या सारखं वाटू लागलं. श्री. रेणुका मातेने आपल्याला अट घातली आहे मागे पाहू नको या वचनांचा विसर पडला आणि बाबाने मागे पाहिले अंबाबाईचे पाय धरले “आई मी अपराधी आहे”.
मी तुला खूप त्रास दिला. पण घरी गेल्यावर मनोभावे तुझी चरण सेवा करीन अज्ञानी लेकरावर दया कर मी तुला काट्या-कुट्या उन्हात इतक्या लांब त्रास दिला हे जगदंबे, रेणुका माते मला माफ कर अशी करुणा भक्त श्री बाबाजी आईच्या पायावर पडून रडू लागले भक्त वत्सल भवानीमातेने भक्ताला उचलून हृदयाशी धरले शांत केले मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू आतापर्यंत माझी खूप सेवा केलीस आणि तुझे वंशज सुद्धा माझी सेवा करतील. माझी तुझ्या घराण्यावर कृपा राहील आता तू घरी जा आणि माझे ध्यान कर. मी मात्र सांगितल्याप्रमाणे इथेच राहील तुला दर्शना साठी माहूरला जाण्याची गरज नाही. तुझ्या घरापासून हे ठिकाण जवळ आहे येथे येऊन दर्शन घेत चल.
श्री. बाबाजींना फार दुःख झाले. आईला आपण घरी आणू शकलो नाही. ज्या घरात आईला आणले नाही ते घर त्यांनी वर्ज्य केले आणि तिथेच आईची सेवा करीत देह अर्पण केला. श्री. बाबाजींची समाधी देवीच्या समोरच आहे असे हे पवित्र ठिकाण आहे.
आजूबाजूच्या परिसरातील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. चैत्री पौर्णिमेस व नवरात्र महोत्सवात सातव्या माळेस येथे मोठी यात्रा भरते. येथे नवस फोडण्याची देखील प्रथा आहे या सभामंडपात दर वर्षी ७० ते ८० भाविक घटी असतात. त्यांना ऊन, पावसापासून रक्षण मिळवण्यासाठी जड परिवाराने श्री. हरिहरराव जड यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिनांक ५.१०.१९९४ सभामंडपाचे बांधकाम केले यानंतर जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार केला या गडास एकूण सत्तर पायऱ्या आहेत नवरात्रात या झाडाच्या देवीचे एकवेळा जरुर दर्शन घ्यावे.
लेखिका- श्रीमती विद्या हरिहरराव जड
edtv news, jalna,-9422219172
( प्रासंगिक लेख आणि दिवाळीच्या योग्य साहित्याला प्रसिद्धी दिली जाईल, इच्छुकांनी संबंधित लेखाविषयी आणि स्वतःचा एक पासपोर्ट फोटो पुढील ईमेलवर पाठवावा. edtvjalna@gmail. com, नवरात्राच्या नऊ रणरागिनी पाहण्यासाठी डाऊनलोड करा,edtv jalna, एप)