शिक्षणाला संस्कृतीची जोड देऊन मुलींनी आपला विकास करून घ्यावा-रीना बसय्ये
जालना-शिक्षणाला संस्कृतीची जोड देऊन मुलींनी आपला विकास करून घ्यावा.त्यासोबत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मुलींसाठी स्वसंरक्षणाचे धडे बंधनकारक करावेत आणि दुसऱ्या बाजूला पालकांनी आपल्या मुलांना देखील संस्कारीत करणे गरजेचे आहे, कारण सध्याच्या डिजीटल युगामध्ये मुलांवर प्रसार माध्यमांचा प्रभाव वाढलेला आहे. त्यामुळे महिलांशी कसे वागावे? त्यांचा आदर कसा करावा? याविषयी देखील पालकांनी आपल्या मुलाला शिकविले पाहिजे. असे मत जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रीना बसय्ये यांनी व्यक्त केले. ई. डी.(इलेक्ट्रॉनिक डिजिटल) न्यूज ची नवरात्रोत्सवानिमित्त “रणरागिणी” ही विशेष मालिका सुरू आहे. या मालिके मधील सातवे पुष्प गुंफताना दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या .
बालपण, शिक्षण, नोकरी, ताणतणाव या सर्वांचा त्यांनी ऊहापोह केला. त्या म्हणाल्या,bsc Bed केल्या नंतर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमाविषयी आणि नोकरी विषयी माहिती मिळाली. आणि तेथून पुढे ध्यास लागला तो सरकारी नोकरीचा. दरम्यानच्या काळात एका आदिवासी शाळेवर शिक्षिका म्हणूनही त्यांनी काम केले, मात्र गावापासून दूर असलेल्या या शाळेवर जाण्या-येण्यासाठी होणारा त्रास, अविवाहित मुलगी आणि तिच्या जबाबदारीमुळे आई किंवा वडील हे सोबत जायचे. आणि त्यांनाही याचा त्रास व्हायचा म्हणून दोन वर्षानंतर एका बँकेमध्ये नोकरी सुरू केली. सरकारी नोकरी चे ध्येय स्वस्त बसू देत नव्हते .महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षांमध्ये यश मिळायचं मात्र मुलाखतीमध्ये अपयश मिळायचं. याचं कारण असं होतं की पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना या आयोगाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली आणि नोकरी करत असताना पाहिजे तेवढा अभ्यास झाला नाही .शेवटी चौथ्या प्रयत्नात यश आलं आणि 2012 मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या महिलांसाठी असलेल्या दोन जागांपैकी एक जागा श्रीमती रीना बसय्ये यांनी पटकाविली.
सध्या त्या जालना जिल्ह्याच्या जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकान, पेट्रोल पंप, शिव भोजन योजना हे त्यांच्या अखत्यारीत येतं.
कोविड च्या काळात कोणीही व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून “अन्नदात्री” म्हणून देखील त्यांना काम करावं लागलं. शासनाच्या शिवभोजन योजनेच्या माध्यमातून दीड वर्ष गरजूंना मोफत अन्न त्यांनी पुरवलं ,खरातर ही शासनाची योजना आणि त्यांनी चालवली .मात्र हे चालवत असताना कोणाचीही तक्रार येणार नाही ,शासनाच्या योजनेला गालबोट लागणार नाही याची दखल घेणे देखील महत्त्वाचे असते आणि ते त्यांनी केलं आहे.
घरी बहिण भावंडांचा मोठा परिवार, चौथीच्या वर्गात शिकत असताना घरातील शेंडेफळ म्हणून रीना बसय्ये यांचा लाडही केला जायचा, कर्णपुरा देवीच्या जत्रेत गेल्यानंतर परत येत असताना फिरून फिरून पाय दुखायले म्हणणारी रीना वडिलांच्या खांद्यावर बसायची, ही आठवण देखील सांगायला त्या विसरल्या नाहीत.
दरम्यान सध्यच्या परिस्थिती मध्ये सर्वत्र महिलांचे राज्य असताना मुलींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, “महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे बंधनकारक केले पाहिजे. बाहेर हे धडे बंधनकारक असताना, घरामध्ये पालकांनीदेखील स्वतःला काही बंधने घातली पाहिजेत आणि ती म्हणजे आपल्या मुलांना सुसंस्कारित करणे .सध्या डिजिटल चा जमानाअसल्यामुळे मुलांवर प्रसार माध्यमांचा मोठा पगडा आहे. मोबाईल ने अतिक्रमण केले आहे, त्यामुळे मुलं या मोबाईलचा कशा पद्धतीने वापर करतात हे जाणून घेऊन त्यांना महिलाप्रति आदर बाळगणे ,त्यांचा सन्मान करणे, असे संस्कार केले पाहिजेत आणि समाज सेवेची सुरुवात ही आपल्या घरापासूनच केली पाहिजे, तरच अनिष्ट प्रथा परंपरा कमी होतील .
शासकीय नोकरी मुलींसाठी सर्वात सुरक्षित आहे दुसऱ्यांची सेवा करण्याचा स्वभाव मुलींच्या अंगात उपजतच असतो, आणि त्या स्वभावाचा पुरेपूर फायदा हा या शासकीय सेवेत घेता येतो. त्यासाठी मुलींनी शिक्षणाला संस्कृतीची ही जोड दिली पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
रोजच्या कामाचा रोजच निपटारा करणाऱ्या रीना यांना कामाचा कधीही ताण येत नाही ,आणि कदाचित आला तर घर सजावटीच्या माध्यमातून त्या हा ताण कमी करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक क्षेत्रात आपला पाठीराखा हा वेगवेगळा असतो आणि त्यांनी दिलेला धीर हा खूप महत्त्वाचा असतो असेही त्या म्हणाल्या.
शांत आणि मृदू स्वभावाच्या असलेल्या जिल्हा पुरवठा अधिकारी रीना या महिला असल्या तरी वेळ प्रसंगी कामकाजात कठोर भूमिका घेतात. म्हणूनच गेल्या वर्षभरात विविध प्रकरणात जनतेच्या तक्रारींचा निपटारा करताना आणि स्वस्त धान्य दुकानदारांच्या विषयी जनतेकडून आलेल्या तक्रारींची घेऊन त्यांनी 38 स्वस्त धान्य दुकानदारांची परवाने निलंबित केले आहेत.
-दिलीप पोहनेरकर, edtv news ,9422219172