कपडा व्यापाऱ्याला साडेतीन लाखांचा गंडा घालणाऱ्या भामट्याला अटक

जालना- जालना शहरातील महेश नथुमल नाथांनी या कपडा व्यावसायिकाला सुमारे साडेतीन लाखांना गंडा घालणाऱ्या जिंतूर येथील एका भामट्याला अटक करण्यात सदर बाजार पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे.
महेश नाथांनी यांचे जुन्या मोंढ्यात कपड्याचे दुकान आहे. दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जिंतूर येथे राहणारा गजानन प्रल्हाद जीखनकर हा या दुकानात आला आणि जिंतूर येथील कविता साडी सेंटर या दुकानात आपण नोकर आहोत आणि मालकाने कपडा घेऊन येण्यासाठी पाठवले असल्याचे सांगितले. नेहमीप्रमाणे महेश नाथांनी यांनी दोन लाख रुपयांचा कपडा ज्यामध्ये साडी, रेडीमेड कपडे, ब्लाउज पीस, अशा विविध प्रकारचा कपडा या नोकराला भरून दिला. त्यानंतर हाच नोकर पुन्हा दिनांक 10 ऑक्टोबर रोजी याच दुकानात आला आणि आणखी एक लाख 26 हजार रुपयांचा कपडा भरून नेला.
यावेळी देखील त्याने कविता साडी सेंटर चे मालक अविनाश मुरलीधर भटकर यांनी पाठविले असल्याचे सांगितले. दरम्यान दिनांक 10 ऑक्टोबर रोजी जिंतूर येथील कविता साडी सेंटरचे मालक आणि त्यांचा नोकर कपडा भरण्यासाठी आले असता नाथांनी यांनी त्यांच्याकडे जुन्या थकबाकीची मागणी केली, मात्र त्यांनी तो कपडा नेला नसल्याचे सांगितले. त्याच वेळी दुकानात असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तो गजानन असल्याचे या मालकाच्या लक्षात आले आणि कविता साडी सेंटर च्या नावावर त्याने तीन लाख 26 हजार रुपयांचा कपडा उचलल्याचे समजले.
याप्रकरणी नाथानी यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास एका दिवसात लावून दिनांक 11 रोजी जिंतूर येथून गजानन जीखनकर या आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रमेश रुपेकर, तसेच संतोष राऊत, कैलास खाडे, अरविंद वर्गणे, दामोदर पवार, दिपक हिवाळे, समाधान तेलंग्रे, सोपान क्षीरसागर, योगेश पठाडे, महिला पोलीस कर्मचारी सुमित्र अंभोरे, यांनी हा तपास लावला.
दिलीप पोहनेरकर, edtv news 9422219172