Jalna DistrictRanraginiSerials

आई सोबत शेतात काम करणारी महिला झाली मोटर वाहन निरीक्षक

जालना-शेतकरी कुटुंबातील महिला देखील इच्छाशक्तीच्या जोरावर काय करू शकतात याचे एक उदाहरण पाहायचा असेल तर सध्या जालना येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जावे लागेल. आणि येथे कार्यरत असलेल्या मोटर वाहन निरीक्षक अनुराधा रघुनाथ जाधव यांना भेटावे लागेल. नवरात्राच्या निमित्ताने ई.डी( इलेक्ट्रॉनिक डिजिटल) टीव्ही न्यूज या डिजिटल पोर्टर वर कर्तृत्ववान महिलांची मालिका सुरू आहे. “रणरागिनी” च्या मालिकेचे आठवे पुष्प गुंफताना अनुराधा यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडले 

एक महत्त्वाचा पैलू समोर आला, तो म्हणजे त्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या आहेत. सातवी- आठवी मध्ये शिकत असताना शेतामध्ये, गोठ्यामध्ये आई सोबत जनावरांची सेवा देखील त्यांनी केलेली आहे. एवढेच नव्हे तर शेतामधील इतर कामे ही त्यांनी केले आहेत, आणि म्हणूनच त्या आत्मविश्वासाने सांगतात की ,”जो हाल अपेष्टा झेलतो तोच परिस्थिती बदलू शकतो “शहरी भागातील नागरिकांपेक्षा ग्रामीण भागातील नागरिकांना प्रत्येक क्षेत्रात परिस्थितीशी झुंज द्यावी लागते, मग ती नोकरी असो, व्यवसाय असो वा उद्योग असो. यामध्ये सूट मिळत नाही. हीच परिस्थिती अनुराधा यांच्याही वाट्याला आली. ग्रामीण भागातून असल्यामुळे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या नऊ वेळा परीक्षा दिल्यानंतर 2014मध्ये हाती यश आलं आणि त्या मोटार वाहन निरीक्षक बनल्या .धार्मिक कुटुंबातून पुढे आलेल्या अनुराधा नवरात्रोत्सव त्या उत्साहात साजरा करतात. विशेष करून मुद्दामून सुट्टी घेतात आणि परिवारात हा आनंदोत्सव साजरा करतात. या वर्षी देखील त्यांनी तीन दिवस सुट्टी घेऊन गावाकडे जाऊन हा आनंदोत्सव साजरा केला. सातारा जिल्ह्यात घर, जालना जिल्ह्यात नोकरी अशा विचित्र परिस्थितीमध्ये त्या काम करीत आहेत. त्यामुळे निश्चितच परिवारासोबत त्या जास्त वेळ देऊ शकत नाहीत मात्र दोन वर्षाच्या मुलीला घरी जाऊन भेटल्यानंतर कार्यालयातील दिवसभराचा ताण निघून जातो हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.

 

छंदाबद्दल त्यांनी पुस्तक वाचायला आवडते आणि सध्या व. पु .काळे या प्रसिद्ध लेखकाचे “पार्टनर” हे पुस्तक वाचणे चालू असल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान जिज्ञासू वृत्ती असल्यामुळे सहाजिकच दूरचित्रवाणीवर सुरू असलेल्या “कोण बनेगा करोडपती” ही त्यांच्या आवडीची मालिका आहे. कारण या मालिकेत विचारलेल्या प्रश्नांची जर उत्तरे आली नाहीत तर ती शोधण्याचा प्रयत्न करता येतो. असेही त्यांनी सांगितले.
नवीन पिढीमध्ये तरुणी मोठ्या प्रमाणात शासकीय आणि खाजगी कंपन्या मध्ये काम करत आहेत. यांना सल्ला देताना अनुराधा जाधव म्हणाल्या,” सरकारी नोकरी मिळाली म्हणजे सर्व काही होत नाही, खरेतर ही नोकरी मिळाली म्हणजे जबाबदारीही वाढते, ही जबाबदारी सक्षम पणे पेलण्यासाठी महिलांनी मानसिकता तयार करायला हवी. कारण सरकारी नोकरी म्हटले की दर तीन वर्षांनी बदली ही आलीच. आणि यामध्ये महत्त्वाचा आधार मिळवावा लागतो तो म्हणजे परिवाराचा .या दोन्ही गोष्टींची सांगड नवीन नोकरी करणाऱ्या नोकरदार महिलेला यायला हवी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
-दिलीप पोहनेरकर,edtv news,9422219172

Related Articles