सावधान! उद्या हेल्मेट शिवाय बाहेर पडाल तर भरावा लागेल दंड
जालना- दसरा संपला आहे आणि दिवाळी तोंडावर आली आहे. त्यामुळे सर्वच व्यवसायाला उभारी आली आहे. त्यातच दिवाळी सणानिमित्त परगावी जाणार येणार्यांची संख्या वाढली आहे. याचा परिणाम रहदारीवर झाला आहे, आणि म्हणूनच अपघाताची संख्या कमी व्हावी म्हणून महामार्ग पोलिसांच्या वतीने उद्या उद्या सोमवार दिनांक 18 रोजी हेल्मेट तपासण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांनी घराच्या बाहेर पडण्यापूर्वी हेल्मेट घेऊन जावे अन्यथा दंड भरायला तयार राहावे अशी परिस्थिती उद्या निर्माण होणार आहे. खिशात पैसे नसले तरी हा दंड त्या वाहनाच्या नावावर कायम राहणार आहे.
सद्यपरिस्थितीत इंधनाचे वाढलेले भाव लक्षात घेता साधारण माणूस दुचाकीवर देखील दोन पेक्षा अधिक व्यक्तींना घेऊन प्रवास करत आहे आणि रस्त्यांची ही परिस्थिती सुधारली आहे त्यामुळे अपघातांची ही संख्या वाढली आहे. परंतु तोंडावर असलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अपघात कमी व्हावेत या हेतूने जालना जिल्हा महामार्ग पथकाच्या वतीने विविध प्रकारच्या वाहनांची नेहमीच तपासणी होत असते. उद्या सोमवार दिनांक 18 रोजी एका विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील कुठल्याही महामार्गावर हेल्मेट तपासणी होणार आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांनी घराच्या बाहेर पडताना सोबत हेल्मेट घेऊन जाणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास दंडही भरावा लागणार आहे. दरम्यान सध्या क्षमतेपेक्षा जास्त वेगाने पळणाऱ्या वाहनांची तपासणी केल्या जात आहे. अंबड- जालना या महामार्गावर ताशी वेगमर्यादा 70 किलोमीटर असताना त्यापेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणाऱ्या वाहनांना अत्याधुनिक यंत्रणेद्वारे दंड आकारला जात आहे. विशेष म्हणजे या दंडामध्ये वाहनाचे छायाचित्र, वेगमर्यादा, तारीख ,वेळ, ठिकाण सर्व माहिती असल्यामुळे वाहनचालकाला “तो मी नव्हेच” असा बहाणा करता येत नाही आणि हा दंड दुसऱ्या वेळेस हे वाहन पकडल्यानंतर भरावाच लागतो .त्यामुळे किमान उद्याच्या दिवस तरी वाहन चालकांनो सावधान व्हा! आणि दंडापासून आपला बचाव करा.
-दिलीप पोहनेरकर edtv news,९४२२२१९१७२