आता पहा झोपूनही चित्रपट पहाता येणार, तोही जालना
जालना- बाहेरगावाहून, मोठ्या शहरातून आलेल्या पाहुण्यांचा जालनेकरांना एकच प्रश्न असायचा, काय आहे तुमच्या जालन्यात पाहण्यासारखं? याला कोणाकडेच उत्तर नसायचं. 8-10 वर्षांपूर्वी जालना शहरातील मोतीबाग बर्यापैकी होती, मात्र आज तीदेखील पाहुण्यांना घेऊन जाण्यासारखी राहिली नाही, जवाहर बाग तर नाला झाला आहे, मग विषय राहतो चित्रपट पाहण्याचा मात्र. त्यासाठी देखील बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्यांसाठी त्यांना अपेक्षित सुसज्ज आणि अत्याधुनिक चित्रपटगृह नव्हते, मात्र आता या सर्व प्रश्नांवर एक उत्तर मिळालं आहे आणि ते म्हणजे “रत्नदीप सिनेमा”.
फेब्रुवारी 2020 मध्ये तानाजी चित्रपट दाखवल्यानंतर नूतनीकरणासाठी बंद झालेलं हे चित्रपट गृह मार्च मध्ये सूर्यवंशी या चित्रपटाने सुरू होणार होतं, परंतु त्यानंतर लागलेली टाळेबंदी ही दीड वर्षे उठलीच नाही. त्यामुळे कदाचित वेळ मिळाल्यामुळे चित्रपटा गृहाच्या आधुनिकीकरणाचे काम वाढत गेलं आणि आज जालनेकरांसाठी एक अत्याधुनिक चित्रपट गृह निर्जंतुकीकरण करून प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत आहे.
कुटुंबीयांसोबत, पाहुण्यांसोबत, मित्र-मैत्रिणींसोबत विरंगुळा म्हणून चित्रपट पाहण्याकडे कल असतो, आणि याचा पुरेपूर फायदा घेतला जातो. आता त्याही पुढे जाऊन सोबत कोणी असो अथवा नसो तुम्ही या चित्रपटगृहांमध्ये तीन तास आरामशीर झोप घेऊ शकता! कारण त्या पद्धतीने इथे सीट ची व्यवस्था केली आहे. मात्र त्यासाठी केवळ बाराच सीट तयार करण्यात आले आहेत. झोपून चित्रपट पाहण्याची ही इथे व्यवस्था आहे .त्यामुळे तुम्ही चित्रपट पहा अथवा नका पाहू पैसे मात्र वसूल होणार !त्यासोबत चित्रपटाचे वेळी तर रेस्टॉरंट चालूच राहील मात्र इतर वेळी देखील तुमच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी पिझ्झा, बर्गर, पॉपकॉर्न, एवढेच नव्हे तर” बुढि के बाल देखील” तुम्हाला येथे मिळणार आहेत .
प्रेक्षकांना आरामशीर चित्रपट पाहता यावा म्हणून पूर्वीची 683 प्रेक्षकांची असलेली क्षमता कमी करून आता 477 करण्यात आली आहे .त्यामुळे रुंद आणि मऊ-मऊ सीट हे प्रेक्षकांना तीन तास आरामदायी सेवा देणार आहे.
* डायमंड क्लासमध्ये 28 सोफा सेट
*गोल्डन क्लास मध्ये 238 आणि बारा लॉन्चर (झोपून पाहता येईल अशा पद्धतीचे सीट)
* सिल्वर (बाल्कनी) क्लासमध्ये 196 असे एकूण 474 प्रेक्षक एका वेळेस चित्रपट पाहू शकतील अशी या “रत्नदीप” ची क्षमता आहे.
अग्रवाल परिवाराचा परंपरागत हा व्यवसाय आहे. ज्यावेळी मुके चित्रपट यायचे त्यावेळी पन्नालालजी अग्रवाल यांनी सुमारे 1937 मध्ये “राजमहल” या चित्रपटाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे चिरंजीव वासुदेवजी आणि आता विनोदजी अग्रवाल यांनी 1996 मध्ये तरुण-तरुणीच्या हृदयात केलेल्या त्या वेळच्या “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे” या चित्रपटाने रत्नदीप सिनेमा ची सुरुवात केली.कोट्यावधी रुपये खर्च करून नूतनीकरण केलेले हे चित्रपटगृह आता औरंगाबादला जाणाऱ्या चित्रपट प्रेमींना ब्रेक लावणारे आहे. सुमारे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दिवाळीच्या पाडव्याला म्हणजेच शुक्रवार दिनांक 15 रोजी “सूर्यवंशी” या चित्रपटाने रत्नदीप सिनेमा ची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात होणार आहे.
-दिलीप पोहनेरकर, edtv news, 9422219172