Jalna District

सहा आणे रोजाने काम करणाऱ्या सासर्‍यांची फोटोग्राफर जावयाच्या मदतीने भरारी

जालना -सन 1971 -72 मध्ये जायकवाडी म्हणजे पैठण ते नांदेड या पाटाचे काम सुरू होते. आणि या कामावर एक टोपलं साहित्य उचललं की एक पैसा मिळायचा. असे काम करत कष्टाच्या जोरावर शेती घेऊन ती आधुनिक पद्धतीने करत “शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार” मिळवला .

शेतकऱ्यांचं हे कष्टाचे जीवन स्वतः अनुभवलं त्यामुळे कदाचित त्यांच्या या मेहनतीला आधुनिकतेची जोड देऊन शेतकऱ्यांचं, बळीराजाचं आयुष्य सुखकर करण्यासाठी धडपड करणारे अंबड तालुक्यातील सारंगपूर येथील शेतकरी प्रल्हाद आबाजी काकडे. त्यांनी आपल्या भाचे जावयाला सोबत घेऊन पाटेकर काकडे ट्रॅक्टर्स ही एजन्सी मिळवली. विशेष म्हणजे पाटेकर परिवारातील विष्णू पाटेकर यांचे देखील 1995- 96 मध्ये रेल्वे स्थानक परिसरात एक छोटेसे छायाचित्राचे दुकान होते. आज या दोघांनी मेहनतीच्या आणि प्रामाणिकतेच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.

खरं तर अशा मोठमोठ्या एजन्सी मिळवणे हे भांडवलदारांचे किंवा पारंपारिक व्यवसायिकांचे काम आहे. अशा या व्यवसायामध्ये एका मराठी माणसाला आणि तीही शेतकऱ्याला अशी एजन्सी मिळणं म्हणजे कौतुकच! प्रल्हाद काकडे हे अण्णा या नावाने परिचित आहेत. त्यांची प्रामाणिकता आणि धडपड पाहून सन 2002 ते 2012 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना जिल्हा परिषद सदस्यही केलं, मात्र राजकीय वातावरण त्यांना पटलच नाही. त्यामुळे त्यांनी हे राजकारण सोडून दिलं आणि पुन्हा शेतीत लक्ष देणं सुरू केलं. खरंतर हे लक्ष पूर्वीच होतं, आणि म्हणूनच शासनाने 1991 ला “शेतीनिष्ठ शेतकरी” म्हणून पुरस्कार देऊनत्यांना सन्मानित केलं. त्यानंतर आधुनिक शेती करत आज अनेक ठिकाणी त्यांची शेती आहे, आणि फळबागामधून मोठे उत्पन्नही मिळत आहे. प्रामाणिकता, मेहनत, आणि सातत्य या तिन्ही गोष्टी प्रत्येकाला मिळतात, त्याचा त्याने उपयोग करून घेतला पाहिजे असे ते आवर्जून सांगतात .


1972 मध्ये स्वबळावर शिक्षण घ्यावे लागले आणि त्यासाठी उन्हाळ्यामध्ये मिळालेल्या सुट्टीच्या दिवसात सहा आणे रोजाने काम करायचं आणि दीड दोन महिन्यात मिळवलेले पंधरा ते वीस रुपये वर्षभर स्वतःच्या शिक्षणावर खर्च करायचे याचं नियोजन त्यांनी केलं आणि त्यामधूनच त्यांना नियोजनाची सवय लागली म्हणून आज हे सर्व वैभव मिळालं असल्याचे ते सांगतात.

दरम्यान एवढा डोलारा एकट्याने सांभाळणे शक्य नसल्यामुळे त्यांनी त्यांचे भाचे जावई विष्णू पाटेकर यांना देखील या व्यवसायात सोबत घेतले आहे. पाटेकर हेदेखील मेहनती आणि कष्टाने पुढे येणारं एक तरुण व्यक्तिमत्व. 1995- 96 मध्ये रेल्वे स्थानक परिसरात छायाचित्रकाराच्या माध्यमातून त्यांनी व्यवसाय सुरू केला. या व्यवसायासोबतच त्यांनी अन्यही काही जोड धंदे केले. मात्र सामान्य माणसासोबत असलेला प्रामाणिकपणा त्यांनी कधी सोडला नाही. त्यामुळे आजही त्यांची समाजाशी असलेली नाळ कायम आहे. या दोघांनी “टाफे मासी फरगुशन” ट्रॅक्टर कंपनीची एजन्सी मिळवली आणि वर्षभरातच व्यवसाय वाढू लागला .त्यामुळे एका चांगल्या उच्चशिक्षित तरुणाची देखील गरज इथे जाणवू लागली, म्हणून किशोर काकडे यांनी कार्यकारी संचालक म्हणून या पाटेकर काकडे ट्रॅक्टर चा पदभार घेतला. अवघ्या एका वर्षांमध्ये दीडशे ट्रॅक्टर त्यांनी विकली आहेत. शेतकऱ्यांबद्दल बोलताना प्रल्हाद काकडे म्हणाले “शेतकरी गरीब असल्यामुळे त्यांना कोणीही फसवतो, प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासोबत घासाघीस केल्या जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील आता या प्रकरणाला बळी न पडता शेतीमध्ये सातत्य ठेवलं पाहिजे, आणि येणाऱ्या संकटांवर मात केली पाहिजे”.
-दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button