वन विभागाच्या परिसरातून गारगोटी चोरीचे प्रमाण वाढले
वाघरुळ -जालना तालुक्यात वाघरुळ परिसरात वनविभागाची अनेक एकर जमीन आहे. या जमिनीवर वृक्षारोपण नसल्यामुळे माळरानावर उजाड असलेल्या या जमिनीचा परिसरातील चोरटे गैरफायदा घेत आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपासून या परिसरात रात्री-बेरात्री उत्खनन करून गारगोटी काढल्या जात आहेत. जेसीबीच्या साह्याने उत्खनन करायचे आणि हे साहित्य ट्रॅक्टर मध्ये भरून अन्य ठिकाणी नेऊन विकायचे असा सध्या सपाटा चालू आहे, आणि यामधून मोठे उत्पन्नही होत आहे. या खड्ड्यातून निघालेल्या विविध रंगाच्या गारगोटी या बाजारात चढ्या भावाने विकले जातात. हिरव्या, केशरी, पांढऱ्या, काळ या अशा विविध रंगांच्या या गारगोटी आहेत.
या गारगोटीचा सौंदर्यप्रसाधनांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर होतो. तसेच ग्रहांच्या अंगठ्या तयार करण्यासाठी देखील या खड्यांचा वापर केल्या जातो. त्यामुळे सुमारे एक ट्रॅक्टर उत्खनन केलेली ही माती तीस ते चाळीस हजार रुपयात बाजारात विकल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्य रस्त्यापासून आत मध्ये हे ठिकाण असल्यामुळे सामान्य माणूस तिकडे फिरकत नाही, याचा देखील फायदा हे चोरटे घेत आहेत. या भागात झालेल्या खड्ड्यांमुळे वन्य प्राण्यांना इजा होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. शासनाची ही संपत्ती असल्यामुळे वनविभागाने तरी त्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
-edtv news,9422219172