दिवाळी अंकबाल विश्वराज्य

मातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य !

अलीकडच्या काळात मातृदिन, पितृदिन असे दिवस साजरे केले जात आहेत आणि असे करण्याची प्रथा पडत असली, तरी भारतीय संस्कृतीने प्रत्येक दिवशीच नव्हे, तर प्रत्येक क्षणी आईवडिलांविषयी मनात कृतज्ञताभाव ठेवण्याची आणि त्यांची सेवा करण्याची शिकवण दिली आहे.


भारतीय संस्कृतीत आई-वडिलांना उच्च स्थान दिले आहे. मातृ-पितृ भक्ती ही श्रेष्ठ भक्ती आहे. आई-वडिलांची सेवा केल्यामुळे गुरूंच्या सेवेचा लाभ आपल्याला होतो. ‘आई-वडील आणि गुरु यांची सेवा करणे, ही सर्वांत उत्तम तपश्‍चर्या आहे’, असे मनुस्मृती या ग्रंथात म्हटले आहे. आई-वडिलांमध्ये आईचे महत्त्व अधिक आहे. त्यानंतर वडील आणि नंतर गुरूंना महत्त्व आहे. आईचा आशीर्वाद मोलाचा आहे. तो अधिक फलद्रूप होतो, असे म्हटले आहे.

आईवडिलांची सेवा आणि आज्ञापालन यांचे ऐतिहासिक आदर्श !आईवडिलांना देवासमान स्थान देणार्‍या संस्कृतीत आईवडिलांच्या आज्ञापालनाचा आणि सेवेचा सर्वोत्तम आदर्श अनेकांनी आपल्यासमोर ठेवला आहे. प्रभु श्रीराम हे अवघ्या भारताचे आराध्यदैवत आहेत. त्यांनी आई-वडिलांच्या आज्ञापालनाचा सर्वोच्च आदर्श घालून दिला. जेव्हा माता कैकेयीने अयोध्येचे राज्य भरताला देऊन रामाने 14 वर्षे वनवासात जावे, असे सांगितले, तेव्हा रामाने कुठलाही किंतु-परंतु मनात न आणता मनःपूर्वक कैकेयीमातेचे आज्ञापालन केले आणि वडिलांचेही वचन राखले. श्रावणबाळाने अंध आईवडिलांची अथक सेवा केली. त्यांनी काशीयात्रेला जाण्याची इच्छा व्यक्त केल्यावर ती पूर्ण करण्यासाठी श्रावणबाळाने त्यांना कावडीत बसवले आणि कावड खांद्यावर घेऊन तो काशीयात्रेला पायी निघाला. भक्त पुंडलिकाकडे तरी अशी कोणती गौरवाची गोष्ट होती ? विद्वान, ज्ञानमूर्ती, प्रसिद्ध पंडित, प्रतिभावंत, ग्रंथकार, संगीतकार किंवा फार मोठा श्रीमंत वा थोर तपस्वी यांपैकी कोणत्या गुणवत्तेसाठी पुंडलिक प्रसिद्ध होता ? पुंडलिक प्रसिद्ध झाला, तो त्याच्या मातृ-पितृ सेवेमुळे ! भक्त पुंडलिकाने आई-वडिलांची केलेली सेवा म्हणजे तपश्‍चर्याच होती. साक्षात भगवंत आलेला असतांनाही तो मातृ-पितृ सेवेपासून विचलित झाला नाही. त्यामुळेच मातृ-पितृ सेवेसाठी आजही पुंडलिकाचे स्मरण केले जाते. आईवडिलांच्या आपल्यावर असणार्‍या उपकारांची जाण ठेवून त्यांची अशा प्रकारे अविश्रांत सेवा करणार्‍यांचा आजच्या काळात आपण विचार तरी करू शकतो का ?

 आशीर्वाद फलद्रुप होण्यासाठी सेवा महत्त्वाची !आई-वडिलांचे मनापासूनचे आशीर्वाद हे त्यांच्या अपत्यांना मिळालेलेच असतात. ती सहजक्रिया प्रेमातून आणि रक्ताच्या नात्यातून घडत असते. कोणतेही आई-वडील सहसा आपल्या मुलांचे अनिष्ट कधी चिंतित नाहीत; पण हा झाला मातृ-पितृधर्म; मात्र जोपर्यंत पुत्रधर्माने, सेवाशुश्रूषेच्या मार्गाने मुलांनी आपल्या माता-पित्यांना मनोभावे प्रसन्न करून घेतलेले नसेल, तोपर्यंत त्यांचे खरे आशीर्वाद कसे लाभणार ? आई-वडिलांच्या निरपेक्ष प्रेमाला मुलांनी त्यांची मनोभावे सेवा करून प्रतिसाद द्यायला हवा.  

नात्यांमधील व्यावहारिकता आणि वृद्धाश्रमांचे पीक !पूर्वीच्या काळी मुलाने आई-वडिलांना काशीला तीर्थयात्रेला घेऊन जायचे, अशी प्रथा होती; पण आज अनेक ठिकाणी असे दिसते की, मुले आई-वडिलांना दुःखी करत आहे. सध्याचे युग ‘गरज सरो आणि वैद्य मरो’, असे झाले आहे. ‘मुलांना पाळणाघरात आणि आई-वडिलांना वृद्धाश्रमात’ ठेवणारी पाश्‍चात्त्य संस्कृतीचा पगडा असलेली पिढी आता आईवडिलांकडे ‘उपयोगिते’च्या दृष्टीने पाहू लागली आहे. आईवडिलांचा अनादर करणार्‍यांवर तेच दुःख उलटते. मुलगा वडील होतो, तेव्हा त्याने आई-वडिलांना दिलेल्या दुःखाचा वाटा त्याच्या वाट्याला येतो.सध्या समाजात आई-वडील वृद्ध झाले की, मुलांना नकोसे होतात. काहीजण ‘त्यांची अडगळ नको’; म्हणून वेगळे घर घेऊन रहातात, तर काही जण त्यांना वृद्धाश्रमात सोडून देतात. नात्यांमध्ये व्यावहारिक दृष्टीकोन आणि पैशांचे प्रेम वाढल्याने आज वृद्धाश्रमांचे पीक येत आहे. वृद्धाश्रमातील वृद्धांच्या व्यथा कोणाही सह्यदय व्यक्तीचे मन हेलावून टाकतात. वृद्धाश्रमात रहाणार्‍या वृद्धांचे कौटुंबिक अवहेलना हे तेथे रहावे लागण्यामागचे मुख्य कारण असते.
ज्या आई-वडिलांनी आपल्यावर चांगले संस्कार करून समाजात नावलौकिक मिळवून दिला, त्यांच्याप्रतीचा हा कृतघ्नपणाच आहे. ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव’ अशी शिकवण देणार्‍या संस्कृतीमध्ये आज ‘आई-वडिलांची सेवा करा, असे सांगावे लागते’, हे लाजिरवाणे आहे. या सर्व परिस्थितीचे कारण म्हणजे संस्कारांची तोकडी पुंजी ! नात्यांमधील ओलावा कमी होऊन एक प्रकारची रूक्षता निर्माण होण्यामागे संस्कारांचा अभाव आणि एकत्र कुटुंबपद्धतीचा लोप ही प्रमुख कारणे आहेत.

संस्कार आणि एकत्र कुटुंबव्यवस्थेचा लोप !मुले लहान असतांना त्यांच्या कोवळ्या मनावर संस्कार करण्याचे खरे श्रेय त्यांच्या आजी-आजोबांनाच जाते. भारतात पूर्वी एकत्र कुटुंबपद्धत असल्यामुळे ते शक्य होत होते. खरेतर प्रत्येक मुलाच्या मनावर धर्म, शास्त्र, नीतीमत्ता इत्यादींसंबंधीचे संस्कार होण्याची नितांत आवश्यकता आहे. ‘आईने मुलांना कसे हाताळावे ? त्यांची काळजी कशी घ्यावी ?’ यासंबंधीचे दिशादर्शनसुद्धा आजी-आजोबांच्या माध्यमातून होत असते. महान भारतीय संस्कृतीचा हा पायाच आहे. आई-वडील आणि आजी-आजोबा यांच्याकडूनच घरातील मुलांवर योग्य संस्कार होतात; पण एकत्र कुटुंबपद्धतीचा लोप होऊन विभक्त कुटुंबपद्धत रूढ झाल्यापासून लहानग्यांवर होणार्‍या संस्कारांना मर्यादा आली आहे. एकत्र कुटुंबामध्ये इतरांचा विचार करणे, मोठ्या व्यक्तींची सेवा करणे, आजारी व्यक्तींची काळजी घेणे असे संस्कार नकळतच घडायचे; पण कुटुंबे विभक्त झाल्यापासून हे चित्र पालटले आहे. आर्थिक आवश्यकतेपोटी म्हणा किंवा प्रतिष्ठेपायी किंवा पैशांच्या हव्यासापोटी आजचे पालक दिवसभर नोकरीनिमित्त बाहेर असतात. त्यामुळे मुलांना वेळ देणार नसतील, तर मुलांवर संस्कार कसे करणार ? पालक जर योग्य संस्कार करण्याचे कर्तव्य पार पाडत नसतील, तर आदर्श पिढी कशी घडेल ? चांगली पिढी घडण्यासाठी पालकसुद्धा संस्कारी, धर्माचरणी आणि साधना करणारे आवश्यक आहेत.अन्यथा संस्कारांच्या अभावी मुले मग मोठेपणी आई-वडिलांना विचारत नाही आणि हे दुष्टचक्र चालू रहाते.जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी पण असे सांगून ठेवलेले आहे की ‘शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी ।’  म्हणजे चांगले पिक यायचे असेल, तर मशागत, खत, पाणी चांगल्याप्रमाणे देणे आवश्यक आहे.तद्वतच संस्काराचे आहे. 

संस्कृतीविरोधी व्यवस्था !आई-वडिलांची सेवा करण्याचे संस्कार लोप पावण्यामागे सरकारी निर्णयही कारणीभूत आहेत. कुटुंबव्यवस्था हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. पती-पत्नी यांनी एकमेकांशी एकनिष्ठ रहाणे, वडिलधार्‍या व्यक्तींची सेवा करणे, यांतून कुटुंबव्यवस्था बळकट होत जाते; मात्र पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणाच्या जात्यात या देशाची तेजस्वी संस्कृतीही भरडली जात आहे. व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली ‘लिव्ह इन रिलेशनशिप’, समलैंगिक संबंध किंवा विवाहबाह्य संबंध यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी तथाकथित बुद्धीवादी प्रयत्नशील आहेत.  

विकृत मालिका आणि चित्रपट !कौटुंबिक हेवेदावे, मत्सर, षड्यंत्रे समाजावर बिंबवण्यामध्ये दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, तसेच चित्रपट यांचाही मोठा वाटा आहे. चित्रपट-मालिका यांचा मोठा पगडा समाजावर असतो. त्यातून नकारात्मक दृष्टीकोन पसरवले जात असल्यामुळेही कुटुंबव्यवस्था आणि संस्कार उद्ध्वस्त होत आहेत.

साधनेचे महत्त्व !हे चित्र पालटण्यासाठी मुलांवर लहानपणीच संस्कार करणे महत्त्वाचे आहे. शिवाजी महाराजांवर त्यांच्या लहानपणी जिजाऊंनी रामायण, महाभारताचे संस्कार केले. परकीय मुघल सत्तेचे जोखड फेकून हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे ध्येय बिंबवले आणि शिवरायांनीही जिजाऊंचे ध्येय साकार केले; पण असे छत्रपती शिवाजी महाराज घडण्यासाठी जिजाऊंचीही प्रथम आवश्यकता असते, हे दुर्लक्षून चालणार नाही. पूर्वी सायंकाळच्या वेळी देवाजवळ दिवा लावून प्रार्थना म्हणून झाली की, घरातील लहान मुले सर्व वडिलधार्‍या मंडळींना खाली वाकून नमस्कार करत असत. प्रतिदिन वाकून नमस्कार करण्याचे संस्कार अगदी बालवयापासूनच आग्रहपूर्वक करावे लागतात. असे संस्कारसंपन्न बालमन पुढील आयुष्यात थोरांसमोर सहसा उर्मटपणा करत नाही. बालपणी नम्रतेचे संस्कार लक्षपूर्वक झाले नाहीत आणि मूल तरुण होऊन त्याचे मन एकदा का निबर झाले की, बुद्धीला नम्रता पटली, तरी ताठ मन खाली वाकून नमस्कार करायला सहसा सिद्ध होत नाही. येथे अहंकार आड येत असतो; म्हणून नम्रतेचे आणि नमस्काराचे संस्कार बालपणीच व्हायला हवेत. घरच्या वृद्ध मातृपितृरूप दैवतांकडे पूर्ण दुर्लक्ष किंवा मनात अढी वा तिरस्कार असतांना केलेली देवभक्ती, तीर्थयात्रा, दानधर्म, पूजापाठ, जपजाप्य आणि समाजकार्य या सर्वांचे मोल म्हणजे एक प्रचंड आकाराचे शून्य असल्यासारखेच असते. वृद्धांची निरपेक्षपणे केलेली सेवा ही साक्षात् ईश्‍वरसेवाच असते. हे सगळे दृष्टीकोन मनात रुजून कृतीत येण्यासाठी, तसेच खर्‍या अर्थाने ‘मातृ-पितृ देवो भव’ असा भाव समाजमनात निर्माण होण्यासाठी आई-वडील, मुले यांसह सर्वांनीच साधना केली पाहिजे. सगळेजण साधनारत असले, तर ‘वडिलधार्‍यांची सेवा करा’, असे सांगावे लागणार नाही आणि आई-वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाश्‍चात्त्यांप्रमाणे एका विशिष्ट ‘डे’चीही आवश्यकता पडणार नाही.
सगळे जण साधनारत, संस्कारी आणि धर्माचरण करणारे असले, तर संस्कारी समाज निर्माण होईल. ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव…’ हे केवळ मूल्यशिक्षणाच्या पुस्तकापुरते किंवा तत्त्वज्ञानाप्रमाणे न रहाता प्रत्यक्षात उतरेल. यासाठी स्वत:सह कुटुंबाला धर्माचरण आणि साधना करण्यासाठी प्रोत्साहित करा अन् साधनेला उद्या नव्हे, तर आजच प्रारंभ करा !


संकलक : चेतन राजहंस,राष्ट्रीय प्रवक्ता,सनातन संस्था ,संपर्क क्रमांक : 77758 58387  

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button