Advertisment
दिवाळी अंकराज्य

   ” दिवाळी- उत्सव नात्यांचा”-सुप्रिया देशपांडे

दिवाळी जवळ आली म्हणून मी आमच्या ह्यांना म्हणाले, अहो, मला यंदा दिवाळीला भारीतली साडी घ्यायचीय आणि एरवी साठी १-२ टॉप आणि एक दोन गोष्टी सांगितल्या. त्यावर ह्यांनी फारसं मनावर न घेता फक्त ‘बरं ‘ असं उत्तर दिलं. मला कळेना की हे इतक्या पटकन कसे तयार झाले. म्हणलं बोनस बिनस मिळाला असेल या वेळी लवकर, म्हणून हो म्हणाले असतील लगेच. पून्हा विचारलं अहो तुम्हाला काय घेवूया तर बघूया नंतर म्हणे. मी ह्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत होते पण खरंतर त्यांचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं, ते त्यांचे जूने-पुराने कपडे शोधून, नीट घड्या घालून, एका पिशवीत भरून ठेवण्यात व्यस्त होते. मी एवढं छान दिवाळीचं प्लान करतीय अन् हे त्या जून्या कपड्यात अडकून बसलेले. विचारलं तर नंतर सांगतो असं म्हणत स्वत: बाहेर जायच्या तयारीला लागले अन् मलाही पटकन तयार हो म्हणाले. मला काही कळेना, म्हनलं एवढ्या लगेच हे खरेदीसाठी कसे तयार झाले बुवा. ह्यांच्या चेहऱ्याकडे नीट निरखून पाहिले तर खूप शांत आणि प्रसन्न भाव होते, एक वेगळाच उत्साह दिसत होता. पटकन आवरलं आणि निघालो, पण आज ज्या रस्त्याने चाललो होतो तो माझ्यासाठी नवीन होता. मी विचारलं की अहो आपण कोणत्या रस्त्याने जातोय अन् कोठे जातोय तर म्हणाले की आपण एका शांत जागी जातोय पण तिथे खूप सारे मुलं पण आहेत आणि तिकडे गेल्यावर तुलाही छानच वाटेल. मनात म्हनलं सरळ उत्तर देईल तो नवरा कसला. एवढं चारदा विचारतीय तर सरळ सांगून टाकावं नं तसं  नाही, उत्सुकता शिगेला न्यायची उगाच.
साधारण अर्ध्या तासाने ह्यांनी एका घरासमोर गाडी थांबवली. आजुबाजुला नजर टाकली तर तिथे फारशी घरं नव्हती ना कसली वर्दळ. साधं काळं कुत्रं पण फिरकत नव्हतं म्हणा नं. अन् आमचे हे मात्र माहेरी आलेल्या नववधू प्रमाणे प्रसन्न होऊन घड्याळाकडे पाहात होते, जणू कोणाची वाट बघतायत. मी त्यांना विचारणार एवढ्यात, रवी भाऊजी येताना दिसले. आमच्या ह्यांचे परम मित्र, बालपणीचे. सोबत रमा पण होती, रवी भाऊजींची बायको आणि माझी खूप छान मैत्रीण. ते आल्यावर हळूच मी रमा ला डोळ्यांनी खुणावत विचारलं की काय चाललंय ह्या दोघांचं तुला काही ठाऊक आहे का पण तिने पण माहित नसल्याचं सांगितलं. सगळे मिळून त्या घरात जायला निघालो अन् घरात गेल्यावर पाहिलं तर क्षणभर मेंदूने काम करणंच बंद केलेलं. दुपारचे बाराची वेळ, एक मुलगा स्वयंपाकात मदत करत होता तर दुसरीकडे काही जण जेवायला बसायची तयारी करण्यात मग्न होते. एक जण झाडून घेत होता तर दुसरा ताट पेले गोळा करत होता. सगळे कसे ठरवून दिलेल्या सुचनांचे पालन करत होते. जवळच उभ्या असलेल्या ह्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला, जवळ घेतले आणि सांगु लागले की, ही मुले कोण असतील ठाऊक आहे? हे अनाथ आहेत, ह्यांना तसं रक्ताच्या नात्याचं कोणी नाही पण तरीही त्यांच्या आनंदात कसलीही कमी नाही. दिवाळी जवळ आली, त्यांना नवीन कपडे घेऊन देणारं सुद्धा कोणी नाही पण तरीही ते आहे त्यात समाधान मानून स्वत:ला आनंदी ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. निरखून पुन्हा त्या मुलांकडे पाहिलं तर लक्षात आलं की त्यांच्या अंगावरचे कपडे हे थोडेफार लहान मोठे होते, दुसऱ्या कोणाचे घातल्या सारखे. हे सांगत होते की इथे असणारी सर्व मुले खूप हुशार अन् मेहनती आहेत. शाळेत घालायला पैसे नाही म्हणून शाळेतील शिक्षक इथे येऊन ह्यांना शिकवतात किंवा काही पालक एक एक मुलांची  जबाबदारी घेतात. आपल्याकडे सर्व गोष्टी असतात त्यामुळे ह्यांच्या दुःखाची आपल्याला कल्पना पण नसते. त्यात सण उत्सव असला की आपण आपल्याच तंद्रीत असतो. म्हणून आज आपण इथे आलोय त्यांना समजून घ्यायला. आपण त्यांना काहीतरी देण्याइतके मोठे नक्कीच नाही पण त्यांना एक विश्र्वास वाटेल बाहेरच्या जगावर की इथे रक्ताच्या नात्या व्यतिरिक्तही नाती असु शकतात.
मला सगळं ऐकून डोळ्यांत पाणी आलं पण मी आवरलं आणि ह्यांच्याकडे अभिमानाने पाहिलं.
तेवढ्यात तिथे एक सद्गृहस्थ आले, त्यांनी आदराने नमस्कार केला आणि एका रूममध्ये नेले व बसायला सांगितले. मी रमा ला घेऊन बाहेर मुलांच्या मदती साठी जाण्याची परवानगी घेऊन बाहेर आले. रवी भाऊजींनी भरपूर फळे आणली होती, ती त्या मुलांमध्ये मोठ्या असलेल्या एका जवळ दिली आणि जेवल्यानंतर खायला सांगितली. ह्यांचा आता थोडा राग आला म्हणलं आधी कल्पना दिली असती तर काहीतरी खायला आणता आलं नसतं का? पण पुरुष ते पुरूषच, मनात काय चालू असतं त्याचा नेम नाही.त्या मुलांनीच उलट आम्हालाच जेवायचा आग्रह केला तेव्हा पुन्हा डोळे भरून आले. सगळ्या मुलांना बसायला सांगितले आणि आम्ही दोघींनी कमरेला पदर खोचून त्यांना वाढायला घेतलं. वाढून झालं पण मुले जेवायची थांबली होती कारण त्यांचे लाडके गणेश काका यायचे बाकी होते. हे सगळे आतल्या खोलीत बोलत बसलेले. ते आल्यावर सर्वांनी हात जोडून “वदनी कवळ घेता नाम घ्या सुखाचे….” म्हणून जेवायला सुरुवात केली अन् आम्ही त्यांना वाढू लागलो. आपण कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात आहोत असं वाटत होतं. जेवण झाल्यानंतर, सर्व आवरल्यावर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारतात किती वेळ गेला काही कळलंच नाही. जाताना, ह्यांनी त्यांचे लहान होत असलेले कपडे गणेश दादांजवळ दिले अन् परत निघायच्या सगळ्या मुलांचा निरोप घेऊ लागलो. काही तासांच्या भेटीतच एक आपलेपणा जाणवला. सगळे विचारत होते पून्हा कधी येणार ते? आता ह्यांच्याकडे न बघता मीच त्यांना सांगितलं की नक्की येऊ लवकरच.
परत येताना डोक्यात एकच विचार घोळत होता की ह्या मुलांच्या गरजा कशा पूर्ण होत असतील? खरंच जर आपल्या नात्यांचं कोणीच नसेल तर जगणं कसं स्विकारावं ह्याचं मूर्तीमंत उदाहरण आहेत ही सगळी मुले. गणेश दादांच्या रूपाने खरोखर गणपती बाप्पाच त्यांचा सांभाळ करतोय असं वाटतं. आपण आपले नाते गोते सांभाळण्यात इतके रमून जातो की त्यात ह्या अशा, खऱ्या, सच्च्या असलेल्या, निस्वार्थ प्रेमाच्या नात्यांना मूर्त स्वरूप देणाऱ्या, उद्याच्या खऱ्या अर्थाने फक्त माणूस म्हणून जगण्यात राम शोधणाऱ्या मुलांकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही असं वाटू लागतं.
उत्सव साजरे करतो आपण ते सर्वांना एकत्र आणण्याकरिता, आजुबाजुचे वातावरण प्रसन्न करण्याकरिता, माणसातलं माणूसपण जपण्याकरिता, खऱ्या अर्थाने नाती समृद्ध करण्याकरिता. रोजच्या धावपळीत आपण आपलेच राहात नाहीत तर बाकीच्यांचे कधी होणार, ही वस्तुस्थिती. सुट्टी असली अथवा काही सण असेल तरच आपल्याला बाकीची नाती आठवतात. पण ह्या मुलांकडे पाहिलं की वाटतं की हे तर रोजच दिवाळी साजरी करतात. फक्त कमी असते ती चटकदार फराळाची, अन् फटाक्यांची. कारण त्यांच्या आशेचे किरण एवढे तेजस्वी आहेत तिथे पणत्यांचा प्रकाश तो कितीसा तेवणार.
                          सुप्रिया अभिजित देशपांडे
                  +91 82756 85959
दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button