तोड हा पुतळा मला हृदयात राहू दे
फक्त या चौकात का..? विश्वात राहू दे….
केवढे आयुष्य अन जगला कितीसा तू
ना पुन्हा मिळणार मी ध्यानात राहू दे…
ईश नाही त्या तिथे काहीच नसते ना…
मंदिरामध्ये नको …,जगण्यात राहू दे…
पायथ्याशी येउनी लोळेल श्रीमंती
एवढी श्रध्दा तुझ्या कामात राहू दे…
भेटल्यावरती मला व्हावे प्रफुल्लित जग
त्या ढगामधल्या अशा थेंबात राहू दे…
शोधतो साऱ्या जगामध्ये उगाचच जे
तो तुझ्या हृदयात हे ध्यानात राहू दे..
जिंकण्यासाठीच केवळ जन्मला आहे
एवढा विश्वास तू लढण्यात राहू दे..
मी कुण्या धर्मातल्या पंथातला नव्हतो
वाटण्यापेक्षा मला अज्ञात राहू दे…
कोपला मंगळ शनी माझ्यावरी बहुधा
चंद्र सुद्धा कुंडलीच्या आत राहू दे…
शोधता आलेच तर शोधून तू ही बघ
“राजपण ” गझलेतले शेरात राहू दे…
*©®डॉ.राज रणधीर*
*९९२२६१४४७१*
*जालना*