दिवाळी अंकराज्य
भीती- डॉ.दिगंबर दाते यांच्या कविता
भीती ‘
गर्दीत फारसे आता जात नाही मी
एकटेपणाची भीती वाटते रे…
आजमावून झाले
भाव-बंध सारे
आपलेपणाची भीती वाटते रे…
आता काय सांगु?
अन् सांगु कुणाला
खरे सांगण्याची भीती वाटते रे….
रंग, रुप, गंध
अन् ते हसणे मंद-मंद
तिला पहाण्याची भीती वाटते रे…
चाल नागीणीची
नयन मीनाक्षी
आता सहवासाची भीती वाटते रे…
भरल्या ह्रदयी
तिच्या नयनी पाणी
मला किणार्यांची भीती वाटते रे…
अलीकडे त्यांचे
झाले गोड बोलणे
या मेहरबाणीची भीती वाटते रे…
झाले स्तब्ध शब्द
झाल्या आर्त भावना
मला भुकंपाची भीती वाटते रे…
******************************************************
पुन्हा उभं रहातांना
किती सहज विसरता यायचं
बोरीची फांदी हुलतांना
बोटातून आलेलं रक्त
खाली पडलेल्या गाभूळ्या
बोरांचा सडा पाहून
बांधावरून फिरतांना
गायी- वासरांना चारा टाकतांना
झाडपाल्याचा गवती वास
सांधत जायचा आपुलकी
निसर्गाशी…
व्यायला यायची गाय जेव्हा- जेव्हा
जागीच असायची माणूसकी
रात्रभर गायीच्या गोठ्याजवळ
कसं कुणास ठाऊक
पुन्हा उभं रहाता यायचं
माणसांना…
कुणी कणसं खुडवून नेल्यावर
जवळचं कुणी पाण्यात
बुडून मेल्यावर
कशाला द्यायचं स्पष्टीकरण
नेहमीच
सर्वच भिंती ढासाळलेल्या घराच्या
नुसत्याच उभ्या असलेल्या
चौकटीसारख्या मनाचं
वाटत असावं
असंच कहीसं त्यांना
पुन्हा उभं रहातांना…
डाॅ. दिगंबर दाते,
मो. नं. 7796014999
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com