आपण माणूस आहोत की कुत्रे?- विनोद जैतमहाल
मनाचा स्वभाव असा आहे की त्याला कुठेच करमत नाही. ते माणसाला जराही शांतता मिळू देत नाही. आयुष्यभर धावाधाव करून, विविध सुखदुःखे भोगूनही हाती काहीच लागले नाही, असे जेव्हा वाटते तेव्हा माणूस अध्यात्माकडे वळतो. मग धार्मिक ग्रंथ त्याला मनाचा स्वभाव सांगू लागतात.
ब्रह्मबिंदू उपनिषद सांगते की,
मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः ।
बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम् ॥
मन हेच मनुष्याच्या बंधनाचे आणि मोक्षाचे कारण आहे. जास्तीत जास्त सुखे ओरबाडणारे मन माणसाला बंधनात पाडते. मात्र कितीही सुखे भोगली तरी तृप्ती होत नाही, असे ज्याच्या लक्षात येते तेच मन माणसाला मुक्तीकडे घेऊन जाते.
आयुष्य एकदाच मिळते म्हणून जितके खाता येईल तितके खाऊन घ्या. व्यसने करून घ्या. स्वैराचार करा. असे तत्त्वज्ञान पाजळणारे लोक या जगात आहेत.रोमचा एक राजा तर जेवण झाले की उलटीचे औषध घेत असे आणि पुन्हा वेगवेगळे पदार्थ खात असे.
आजचा माणूसही तसाच वागतो. त्याला कळत असते की मैदा, साखर, केकसारखे पदार्थ घातक आहेत. पण तरी तो स्वतःला आवरू शकत नाही. खाताना थोडा वेळ सुख मिळते. पण नंतर अनेक गोळ्या, औषधे मागे लागतात.
लग्नाचा जोडीदार सोडून इतर भानगडी करणारेही तसेच दुःखात पडतात. तरीही त्यांना मन आवरता येत नाही.
त्यांना भगवद्गीता सांगते…
यः तु इंद्रियाणि मनसा नियम्य आरभते अर्जुन।
कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् असक्तः सः विशिष्यते।।
जो मनुष्य मनाद्वारे इंद्रियाणा आवरतो आणि लोभ सोडून काम करतो तो मनुष्य विशिष्ट, श्रेष्ठ आहे.
हे गीतेचे श्लोक तुम्ही कितीही पाठ केले तरी तुम्हाला स्वर्ग वगैरे मिळणार नाही. पण त्यांचा अर्थ समजून वागलात तर आज, आत्ता आणि येथेच तुमच्या आयुष्याचा स्वर्ग होईल.
शिक्षणाने माणसे सुधारतात असे आपल्याला वाटत असले तरी प्रत्यक्षात तसे होत नाही. शिक्षणाने माणसे चतुर होतात आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्ट होतात.माणूस मनाला आवरायला शिकतो संस्काराने.
भागवत पुराण माणसाला सांगते…
उद्धरेत् आत्मना आत्मानं न आत्मानम् अवसादयेत् |
आत्मा एव हि आत्मनः बन्धुः आत्मा एव रिपुः आत्मनः ||
माणसाने स्वतःच स्वतःला उंचीवर न्यावे. स्वतःच स्वतःचा घात करू नये. आपणच आपले बंधू असतो आणि आपणच आपले शत्रू असतो.
या संस्कारांचा कुठल्याही धार्मिकतेशी संबंध नाही. ही थेट मनाला दिलेली शिकवण आहे. ती लहानपणीच मुलांना मिळाली पाहिजे. शाळेतील मुलांना जेव्हा या श्लोकांमधील तत्त्व उलगडून सांगितले जाते तेव्हा त्यांच्या डोळ्यांतील चमक आम्ही शिक्षक म्हणून प्रत्यक्ष अनुभवली आहे.
संत कबीरही म्हणतात की,
मन मरा न माया मरी
मरी मरी गया शरीर।
आशा, तृष्णा ना मरी
कह गये दास कबीर।।
आयुष्य संपले तरी माणसाची हाव कधीच संपत नाही. त्यामुळेच त्याला समाधानही मिळत नाही. हावरट माणसे समाज आणि देशासाठी कोणतेही उत्तुंग काम करू शकत नाही. स्वतःच्या लालसेमागे धावणारे कुत्रे जसे ट्रकखाली येऊन मरते तशीच माणसाची गत होते.
“आपण माणूस आहोत की कुत्रे?” हा विचाराचा फटाका या दिवाळीच्या निमित्ताने चेतवूया. ज्ञानाचा प्रकाश पसरवणे हीच खरी आपली दिवाळी.
संत ज्ञानेश्वर म्हणतात…
सूर्ये आधिष्ठिली प्राची
जगा जाणिव दे प्रकाशाची।
तैसी श्रोतया ज्ञानाची
दिवाळी करी।।
विनोद जैतमहाल 9823028332