edtv डिजीटल प्लॅटफॉर्मचा ‘ अंकूर ‘ दिवाळी अंक
दिवाळी म्हणजे ‘ तिमिरातूनी तेजाकडे ‘ घेवून जाणारा प्रकाशोत्सव. मराठी साहित्यात अनन्यसाधारण महत्त्व असलेला एक घटक.कवी,लेखक, कथाकार,चित्रकार, नाटककार, व्यंगचित्रकार,कादंबरीकार, यासह साहित्यिकांना नावलौकिक मिळवून देणारा हा दुवा…मराठी दिवाळी अंकाची परंपरा एक शतक एक दशकाहून अधिक पुढे आली आहे.ब्रिटीशांनी भारतात जेव्हा मुद्रणकला आणली तेव्हापासून लिखित साहित्य पुढे आले.बंगालमध्ये दुर्गा उत्सवाची परंपरा आहे.या दरम्यान विशेष अंक काढण्याची परंपरा आहे.बंगालमधील या परंपरेने तत्कालीन ‘ मनोरंजन ‘ मासिक चालविणारे काशिनाथ माजगावकर यांचे लक्ष वेधले. माजगावकर यांनी तो अंक पाहिला,आणि त्यावरून मराठी असाच अंक काढावा असा विचार मनात आला.बंगाली ‘ मित्र ‘ आडनावाचे मित्र असल्याने माजगावकर यांनी ‘ मित्र ‘ हे आडनाव स्वीकारले..यातूनच मराठी दिवाळी अंकाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मनोरंजन मासिकाने १९०९ मध्ये पहिला दिवाळी अंक काढला.
अडीचशे पानांच्या अंकात नामदार गोपाळ कृष्ण गोखले,साहित्य सम्राट न.चिं.केळकर,र.पु.परांजपे, रेव्हरंड ना.वा.टिळक,बालकवी यांच्यासह अनेक कवी लेखकाचे साहित्य होते. मराठी साहित्य जनमाणसात पुढे आणत ते समृद्ध करण्याचे काम दरवर्षी दिवाळी अंक करतात. दिवाळी अंकाची ११२ वर्षाची परंपरा आजही सुरु आहे. काळानुसार टप्पे,प्रकार,साहित्य आणि अंकाचे छपाई तंत्रज्ञान बदलत गेले. ऐंशीच्या दशकानंतर संगणक आले आणि दिवाळी अंकाचा चेहरा बदलला.कृष्ण धवल ते हायटेक फोरकलर,मल्टीकलर असा प्रवास आहे. दिवाळी अंकात ‘ मौज ‘ अंकाचा सिंहाचा वाटा आहे.नव्वद वर्षाच्या पुढे वाटचाल करीत आहे.साने गुरुजींनी सुरु केलेल्या ‘ साधना ‘ दिवाळी अंकाने महाराष्ट्रात वैचारिक वाचनसंस्कृती रुजविली आहे. आजही ‘ साधना’ परंपरा टिकून आहे,हे विशेष. दिवाळी अंकाचे शेकडो विषय असताना, विनोदी साहित्यावरील विशेष दिवाळी अंक ‘ आवाज ‘ ची परंपरा आजही आहेच. मराठीत आजच्या घडीला पाचशेहून अधिक दिवाळी अंक निघतात. आज साहित्य, कला,संस्कृती,वैद्यकीय, विनोदी,महिला विषयक,राशी भविष्य, आरोग्य, क्रीडा,संगीत,चित्रपट, कृषीसह अनेक विषयानुसार दिवाळी अंक निघतात.मराठी दिवाळी अंकात वेगळे स्थान निर्माण केले ते ‘ विश्रांती ‘ दिवाळी अंकाने. विषयाची वैविध्यपूर्णता ही या दिवाळी अंकाची ओळख.मागील दीड वर्षांपासून जगाला अस्वस्थ करणाऱ्या ‘ कोरोना ‘ ने दिवाळी अंकाची दिशा बदलवली. आजच्या घडीला डिजीटल प्लॅटफॉर्म हा नवा बदल दिवाळी अंकात दिसून येत आहे. दिवाळी अंकाचे नवे रूप धारण केले आहे.जालन्यातून पहिल्यांदाच डिजीटल प्लॅटफॉर्मवरील दिवाळी अंक काढण्याचे काम मेघा पोहनेरकर या करीत आहेत,हे विशेष…
डीजीटल दिवाळी अंकात ‘दीपावलीचे अध्यात्मशास्त्र ‘ , हा दत्तात्रय वाघुळदे यांचा लेख आहे. लेख प्रकारात ‘ ‘ ‘दिवाळी उत्सव नात्यांचा ‘ हा सुप्रिया देशपांडे यांचा लेख असून सण उत्सवात नातेबंध याचा विचार यात मांडला आहे.भगवान श्रीकृष्ण आधुनिक काळात अध्यात्म विचार मांडणारा ‘ श्रीपाल प्रभूपाद त्यांनी असे घर बांधले ‘ हा इस्कॉनचे रास गोविंदप्रभू दास यांचा अभ्यासपूर्ण चिंतनपर लेख अंकात आहे.कवी,लेखक,पत्रकार विनोद जैतमहाल यांनी ‘ ‘आपण माणूस आहोत,की कुत्रे ‘ या ललितलेखातून माणसांच्या स्वभाव वृत्तीचे परखड चित्रण मांडले आहे.डिजीटल दिवाळी अंकात ‘ गाण्याचे शिक्षण घेताना ‘ हा अनुभव कथन करणारा लेख संगीत शिक्षक दिनेश संन्यासी यांनी लिहिला आहे.लेखिका,भावकवयित्री शांताबाई शेळके यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे.यानिमित्ताने आरती सदाव्रते यांनी ‘ पैठणी ‘ ही कविता सादर केली आहे.अंकात कविता प्रकारात कवी डाॅ.दिगंबर दाते यांच्या दोन कविता,कवयित्री आरती जोशी,सुरेखा मत्सावर,सुजाता सावंगीकर यांच्या कविता आहेत.कवी कृष्णा आर्दड यांनी सादर केलेली ‘ जीव घेतेस ग सखे साजणी ‘ ही लक्षवेधी कविता आहे.डिजीटल अंकात गझलकार डाॅ.राज रणधीर यांची ‘ तोड हा पुतळा,मला हदयात राहू दे ‘ ही गझल आहे.अंकात नाथ्रेकर प्रतिष्ठानचा संस्कृत प्रचार आणि प्रसार कार्याची विशेष दखल घेण्यात आली आहे.पर्यावरण विषयक विषयात ‘ सृष्टी फाऊंडेशन कार्याचा परिचय करून देण्यात आला आहे.डिजीटल दिवाळी अंकात चित्रकार अरविंद देशपांडे यांचे विविध विषयावरील निसर्ग, व्यंगचित्राचा व्हीडीओ तयार करण्यात आला आहे…
वाचक,रसिकांना edtv ( इलेक्ट्रॉनिक डिजीटल) चा ‘ अंकूर ‘ डिजीटल दिवाळी अंक पसंत पडेल,अशा अपेक्षेसह दीपोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…..
डाॅ.सुहास सदाव्रते मानद संपादक
+91 94045 36767