शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आजी- माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला; 12 तारखेला येणार प्रचिती
जालना- अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले परंतु या नुकसानी मधून नेमक्या भाजपा आमदाराच्या मतदारसंघातील गावांना वगळण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या बदनापूर मतदार संघातील भाजपचे आ. नारायण कुचे यांनी दिवाळी सणाच्या दिवशी म्हणजे चार तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडले आणि आंदोलन केले. पंधरा दिवसांपूर्वीच जालना दौऱ्यावर आलेल्या कृषी मंत्री दादा भुसे यांच्या आढावा बैठकीत देखील आमदार कुचे यांनी मंत्रिमहोदयांना धारेवर धरले होते, मात्र माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आमदार कुचे यांना गप्प बसवलेआणि बोलू दिले नाही.नाहीतर कदाचित त्याच वेळी वाद सुरू झाला असता. त्यावेळेपासून आ.नारायण कुचे हे कुठलातरी विषय शोधतच होते. बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी सर्कलमधील आणि भोकरदन तालुक्यातील राजुर सर्कलमधील अतिवृष्टीच्या नुकसानीपासून काही गावांना वंचित ठेवल्याचे या प्रश्नावर त्यांनी चार तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन केले .विशेष म्हणजे या आंदोलनात शिवसैनिक देखील उपस्थित होते आणि त्यांनीही भाषणबाजी केली. एवढेच नव्हे तर एका जिल्हा परिषद सदस्याने नुकसान भरपाई न मिळाल्यावर आपण पदाचा राजीनामा देऊन हे देखील जाहीर केले. या सर्व प्रकारानंतर त्यांनी शासनाच्या विनंतीला मान देऊन 12 तारखेपर्यंत आंदोलन मागे घेतले आणि 12 तारखेला जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने राजेश टोपे यांच्या घरावर ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. त्याचाच एक भाग म्हणून आज आमदार कुचे यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन 12 तारखेच्या आंदोलनाची पूर्वसूचना दिली.
दरम्यानच्या काळात माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात आ. कुचे यांचा चांगलाच समाचार घेतला आणि आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक असून लवकरच दिवाळी संपताच कार्यालय सुरू होतील आणि हे अनुदान त्यांना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचेही सांगितले आणि विश्वास त्यांनी दिला. हेअनुदान दिल्यानंतर मात्र गावागावांमध्ये” काव-काव” करणाऱ्या अशा “कावळ्यांना” हाकलून लावा असेही ते म्हणाले. त्यामुळे आता या दोन सर्कलमधील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीचा अनुदानावर वरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने आली आहे. 12 तारखेचे ट्रॅक्टर मोर्चाचं नेतृत्व हे भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे करणार आहेत त्यामुळे दानवे यांच्या मतदार संघातील मतदारांसाठी माजी मंत्री अर्जुन खोतकर हे देखील आपली प्रतिष्ठा पणाला लावतील. या दोघांच्या प्रतिष्ठेची मध्ये शेतकऱ्यांचा फायदा होईल हे मात्र निश्चित. परंतु त्यानंतर पुन्हा सुरू होईल ती श्रेयवादाची लढाई.
-दिलीप पोहनेरकर, edtv news,9422119172