पोलीस यंत्रणा ढेपाळली; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात भाजपाच्या दुसऱ्या टीमचा गोंधळ
जालना -जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन गट झाले आहेत हे आता सर्वश्रुत झाले आहे. एका गटाने आंदोलन केले की दुसरे गटही दुसऱ्या ठिकाणी हेच आंदोलन करणार हे आता नेहमीचेच झाले आहे, चार दिवसांपूर्वी भाजपाचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या दालनात ठिय्या दिला होता, आणि त्यांना समजावून सांगताना जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांचे नाकीनऊ आले होते. दरम्यान कसेबसे लोणीकर यांच्यासह कार्यकर्त्यांना सभागृहात बसविले आणि तातडीची सर्व विभागात प्रमुखांची बैठक बोलावली आणि घोषणाबाजी न करता हा विषय संपला होता.
परंतु आज भारतीय जनता पक्षाच्या खासदार रावसाहेब दानवे यांच्या गटाने त्रिपुरा मधील घटनेचे महाराष्ट्रात उमटलेले पडसाद यावरून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले आणि त्रिपुरा मध्ये कोणतीही घटना घडलेली नसताना महाराष्ट्रात दंगल घडविण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. तसेच मालेगाव, अमरावती, नांदेड या ठिकाणी दंगली घडवून आणल्या या दंगलीची सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि मार्फत चौकशी करावी, आणि दोषींना अटक करावी अशी मागणी करत या सर्व प्रकाराला कारणीभूत असलेल्या रजा अकादमी वर बंदी आणावी अशी मागणी ही या वेळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
दरम्यान याा संदर्भातील निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे, कार्याध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, आमदार नारायण कुचे ,यांच्यासह पदाधिकारी जात असताना मुख्य प्रवेशद्वारातच काही पदाधिकाऱ्यांसोबत पोलिसांची शाब्दिक चकमक उडाली, त्यानंतर हे पदाधिकारी पोलिसांना गुंगारा देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पर्यंत पोहोचले. आणि दालनासमोर पोलीस प्रशासन आणि आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. एवढ्यावरच न थांबता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घुसून एकेरी भाषेचाही या कार्यकर्त्यांनी उपयोग केला. त्यामुळे एवढे कार्यकर्ते इथपर्यंत पोहोचलेच कसे? हा प्रश्नही उपस्थित होत आहे. दरम्यान जिल्हाधिकारी सुरू असलेली बैठक सोडून येथे हजर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर बोलणे योग्य होणार नाही म्हणून या प्रतिनिधींना त्यांनी बाहेर जाण्यास सांगितले.
पोलिसांना गुंगारा देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या विरोधात घोषणा ऐकायला मिळाल्या त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांचे बांधलेले हात पुन्हा एकदा स्पष्ट दिसू लागले आहेत. एकंदरीत आजच्या या प्रकाराने ढेप आलेल्या पोलीस यंत्रणेचा अनुभव स्वतः जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना आला आहे. त्यामुळे आता पुढे भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांवर आणि या कार्यकर्त्यांना जमावबंदीचा आदेश असतानाही त्यांच्या जालना पर्यंत घुसू देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे आता लक्ष असणार आहे.
-दिलीप पोहनेरकर,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app