मराठवाडा

रेमडीसीवर इंजेक्शन चोरीप्रकरणी आठ जणांची कसून चौकशी

जालना सामान्य रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयातून काल दिनांक अकरा रोजी दोन रेमडीसीवर इंजेक्शन चोरीला गेले होते. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता. आणि रात्री दहा वाजता या इमारतीच्या मागील बाजूस हे दोन्ही इंजेक्शन सापडले ही होते. मात्र याची चोरी कशी झाली? याचा तपास लावणे अद्याप बाकी आहे. त्यासाठी कदीम जालना पोलिसांनी आज आठ जणांना चौकशीसाठी बोलावले होते. कदीम जालना पोलिस ठाण्यात आज अजय सोनवणे, अरुण भोंडे, योगेश मस्के, आणि अशा वाकडे या सफाई कामगारांना तर सरिता पाटोळे, प्रतिक्षा अवचार, सीमा ठाकुरी, रिमा निर्मळ, या चार परिचारिकांना चौकशीसाठी बोलावले होते. विशेष म्हणजे नवीन कोविड हॉस्पिटलमध्ये गेल्या वर्षभरापासून या सर्व परिचारिका एके ठिकाणी कार्यरत होत्या मात्र सोमवारपासून या सर्वांची बदली जुन्या इमारतीमधील कोविड हॉस्पिटलमध्ये करण्यात आली होती. सकाळी दहा वाजल्यापासून परिचारिका आणि सदाई कामगार या आठही जणांची कसून चौकशी करण्यात आली. आणि त्यांचे जवाब नोंदविण्यात आले आहेत .
दरम्यान आज परिचारिका दिवस असल्याने सकाळी सामान्य रुग्णालयात छोटेखानी कार्यक्रम झाला.

इमारतीच्या मागील बाजूस हे दोन्ही इंजेक्शन सापडल्यानंतर काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास कंत्राटी कर्मचारी आणि या परिचारिका यांच्यामध्ये चांगलाच वाद उफाळून आला होता. पोलीस वेळेवर पोहोचले नसते तर हाणामारी देखील झाली असती.
महिनाभरापूर्वीच कोरोना बाधित रुग्ण पिंप्राळे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बोटांचे ठसे वापरून त्यांच्या खात्यातून रक्कम पळविण्याची घटना घडली होती. त्यानंतर मागच्या आठवड्यात औरंगाबाद येथे काळ्याबाजारात विक्री होणारे रेमडीसीवर इंजेक्शन पकडण्यात आले होते. त्यापैकी चार आरोपी हे बदनापूर येथील होते .त्यामुळे या इंजेक्शनचा होणारा काळाबाजार हा जालना येथील सामान्य रुग्णालयाशी जोडलेला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु आरोग्य विभागाने या सर्व प्रकरणाची चौकशी केली आणि तथ्य आढळले नाही असा निर्वाळा देऊन प्रकरण मिटविले होते .मात्र आता पुन्हा 2 इंजेक्शनची चोरी झाल्याची घटना घडल्याने या हॉस्पिटल मधील गैरकारभार उघडकीस येत आहेत.

Related Articles