Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

लस घेतली तरच मिळणार पेट्रोल आणि चहा पाणी- जिल्हाधिकार्‍यांनी काढला फतवा

जालना-कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका टाळण्यासाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण आणि मास्क वापरणे आवश्यक असून जिल्हयातील सर्व व्यापारी, हॉटेल चालक, पेट्रोलपंपचालकांनी आपले सर्व कर्मचारी आणि येणाऱ्या ग्राहकांचे लसीकरण केल्याची जबाबदारीने खात्री करावी. या बाबत कुठलीही दिरंगाई करु नये, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केली. आपले व आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्राधान्याने लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.  

                     कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी यांनी आज व्यापारी, हॉटेल व पेट्रोलपंपचालकांशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. जयश्री भुसारे आदींची उपस्थिती होती.

                     जिल्हाधिकारी म्हणाले की, कोरोनाचा नवा व्हेरिएंट अधिक चिंता वाढवणारा आहे. यापासून बचावासाठी प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे दैनंदिन व्यवहारात दुकानं, हॉटेल, पेट्रोलपंपांशी सर्वाधिक लोकांचा संपर्क येतो. अशा ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. तसेच येणाऱ्या ग्राहकांनी लसीकरण केले का? याची खात्री संबंधित आस्थापनाचालकांनी करावी. लसीकरण न  केल्याचे आढळल्यास सेवा देऊ नये. याबाबत हलगर्जीपणा आढळल्यास प्रसंगी कारवाई केली जाईल. प्रशासनामार्फत अचानक तपासणी करण्यात येईल. दरम्यान, दि. १ डिसेंबरपासून कडकपणे लसीकरण तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी सर्व आस्थापनांनी ग्राहकांच्या लसीकरणाबाबत दक्षता घ्यावी. लसीकरणाबरोबरच प्रत्येकाच्या तोंडावर मास्क असणे गरजेचे आहे. याबाबतची तपासणी जागरुकतेने करावी.

                     कोरोना प्रतिबंधक लस मोफत असून ग्राहकांचे सुलभपणे लसीकरण होण्यासाठी आस्थापनांच्या मागणीनुसार आवश्यक त्या ठिकाणी लसीकरण केंद्रही उपलब्ध करुन दिले जाईल, यासाठी संबंधीत आस्थापनाचालकांनी जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा लसीकरण अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हाधिकांऱ्यानी केले.

                      जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, लोकांचे आरोग्य महत्वाचे असल्याने संबंधित आस्थापनांना प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे. त्यामुळे व्यापारी, हॉटेल व पेट्रोलपंप चालकांनी आपले आर्थिक नुकसान होऊ नये, तसेच तिसऱ्या लाटेमुळे लोकडाऊनचे संकट ओढाऊ नये, यासाठी सतर्कतेने ग्राहकांना सेवा दयावी. ज्यांनी लसीकरण केले नाही त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे. लसीकरण न केलेल्या ग्राहकांना दुकानात प्रवेश देऊ नये.

                     मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जिंदल यांनी संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लसीकरण व मास्क वापरणे हेच प्रभावी साधन असल्याचे सांगून लसीकरण मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.

*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button