बीड- माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षिकेत अनेक दिवसापासुन वाद आहे. हा वाद वरीष्टांपर्यंतही पोहचला आहे. या वादामुळे ग्रामस्थांनी शाळाही बंद ठेवली होती. याच वादातून शिक्षिका संगीता राठोड यांनी शनिवारी (ता. चार) दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदर शिक्षिकेला शहरातील खासगी रुग्णयलायत उपचारार्थ दाखल केले असून या घटनेने खळबळ उडाली आहे.
राजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी जिंकलवाड आणि सहशिक्षीका संगीता राठोड यांच्यात मागील अनेक दिवसांपासून वाद आहे. कोरोनाच्या प्रदूर्भावानंतर दीड वर्षानंतर शाळा उघडल्याने त्यांच्यातील हा वाद चव्हाट्यावर आला. शाळेतच मुलांसमोर दोघांतील अंतर्गत वाद होऊ लागल्याने याची कुणकुण गावातील पालक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थांना लागली. त्यांच्या वादात विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने दोघांचा वाद मिटवण्याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्याना निवेदन देऊन पालकांनी शाळा बंद ठेवली होती.
या तक्रारीवरून गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण भेडसकर यांनी चौकशी करून वरिष्ठांना अहवाल सादर केला. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दोघांची सोमवारी (ता. सहा) सुनावणी ठेवली होती. त्याअगोदरच शिक्षिकेला संगीता राठोड या शनिवारी (ता. चार) सकाळी राजेवाडी येथे शाळेत गेल्यानंतर 12 वाजण्याच्या दरम्यान विष घेतले. यामुळे शाळेतील शिक्षक घाबरून गेले. त्यांनी तात्काळ संगीता राठोड यांना माजलगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुख्याध्यापकांच्या वादातूनच शिक्षिका राठोड यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे.
*edtv news, beed*