Jalna Districtजालना जिल्हा

आपणच आपल्या मुलांना “स्क्रीन पॉयझन” च्या आहारी घालून व्यसनाधीन करत आहोत,डॉ.सेठिया

 

जालना -आपणच आपल्या मुलांना “स्क्रीन पॉयझन” च्या आहारी घालून व्यसनाधीन करत आहोत, त्यासोबत सोशल मीडियाचा जास्त वापर करून आपण आपल्या नातेवाइकांच्या आणि आप्तेष्टांच्या जवळ न पोहोचता त्यांच्यापासून दूर पोहोचत आहोत असे, मत व्यसनमुक्तीसाठी “पोस्ट डॉक्टोरल फेलोशिप” मिळविलेल्या मानसोपचार तज्ञ डॉ. सुरज सेठिया यांनी व्यक्त केले आहे.

*विस्थापित कुटुंब हेदेखील व्यसनाचे प्रमुख कारण*
पूर्वी एकत्रित कुटुंबामुळे घरातील आजी,आजोबा आणि ईतर थोर व्यक्तींकडून मुलांवर संस्कार केले जायचे, त्यांच्यावर हालचालीवर, वागणुकीवर विशेष लक्ष असायचे. ही बाब म्हणजे एक प्रकारे सुरक्षाकवच होती. मात्र, हल्लीच्या विस्थापित कुटुंबामुळे एकाकीपणा वाढू लागला, त्यातूनच मनुष्य व्यसनाच्या आहारी जातो आहे, असे एका निष्कर्षातून समोर आले आहे.

*मोबाईलचे व्यसन म्हणजे स्क्रीन पॉईझन*
दारू, गांजा, सिगारेट आणि अमलीपदार्थप्रमाणेच मोबाईलचे अबाल ते वृद्धापर्यंत सर्वांनाच जडलेले व्यसन म्हणजे स्क्रीन पॉयझन (आभासी ) या प्रकारातील आहे. मोबाईलमुळे कुटुंबातील संवाद कमी होत चालला असून, त्यातून एकलकोंडेपणा वाढत आहे. विचार करण्याची, एकमेकांना सल्ला देण्या-घेण्याची सवय, एकाग्रता लोप पावत चालली आहे. रात्री-बेरात्री सतत मोबाईलवर व्यस्त राहणे, उशिरा झोपणे, फेसबूक, व्हाट्सअप आदी सोशल मीडियाच्या आहारी जाण्यामुळे मानसिक विकारासह अनेक दुष्परिणाम होत आहेत. इतर व्यसनातून मुक्त करण्यासाठी मानसोपचार तज्ञ आणि व्यसनमुक्तिवर काम करणारेतज्ञ असे पर्याय आहेत. मात्र, मोबाईलरुपी ह्या स्क्रीन पॉयझनमधून जनतेला बाहेर काढण्यासाठी काय करावे लागेल, हा मोठा प्रश्न आमच्यासारख्या मानसोपचार तज्ञ आणि व्यसनमुक्तीवर काम करणाऱ्यांना पडला असल्याचे डॉ. सुरज सेठीया यांनी सांगितले.

 डॉ. सेठीया हे मराठवाड्यात एकमेव डॉक्टरआहेत. या फेलोशिपसाठी महाराष्ट्रात फक्तं 5 जागा होत्या. त्यातून डॉ. सेठीया यांनी मिळवलेल्या या उपलब्धतेमुळे जालना जिल्ह्यातील व्यसनमुक्ती क्षेत्रातील उणीव भरून निघण्यास मदत होणार आहे.
डॉ. सुरज सेठीया यांनी एमबीबीएसनंतर मुंबई येथील डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून मानसोपचारात एमडी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अनुभवासाठी आशिया खंडातील सर्वात प्रसिद्ध आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतील मानसोपचार संस्था निमहॅन्स अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्युरोसायन्सेस येथून चाइल्ड रिव्हाबलीटेशन (पुनर्वसन) आणि व्यसनमुक्ती हे 5 महिने कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण केले.एमडीनंतर डॉ. सुरज सेठीया यांनी महाराष्ट्रातील एकमेव आरोग्य विद्यापीठांतर्गत असलेल्या ग्रँड गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अँड सर जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, मुंबई येथे व्यसनमुक्तीसाठी पोस्ट डॉक्टरेट फेलोशिपसाठी नोंदणी केली आणि 1 वर्षात ही फेलोशिप पूर्ण केली. या फेलोशिपसाठी दरवर्षी महाराष्ट्रातून केवळ 5 जागा असतात. त्यात डॉ. सेठीया यांनी गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश मिळवून फेलोशिप पूर्ण केली आहे. व्यसनमुक्तीसाठी पोस्ट डॉक्टोरल मिळणारे ते मराठवाड्यातील पहिले डॉक्टर ठरले आहेत.

या व्यसनमुक्तीसाठी पोस्ट डॉक्टोरल फेलोशिप करण्याचा उद्देश विषद करताना डॉ. सेठीया म्हणाले की, वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन ही एक जागतिक समस्या बनली आहे. घरातील एका दारू अथवा अमली द्रव्य सेवन करणाऱ्या व्यसनी व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंब बरबाद होते, काहीजण दारूच्या व्यसनापायी शेत वा संपत्ती विकण्यास मागेपुढे पाहत नाहीत, अशा व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलतो, व्यसनामुळे गुन्हेगारी वाढीस लागते, व्यसनासाठी पैसा कमी पडू लागल्यास चोऱ्या, दरोडे, वाटणाऱ्या असले प्रकार वाढत असल्याची अनेक उदाहरणे वारंवार समोर येत आहेत. आजकाल तरुण पिढीही मौजेखातर व्यसनाकडे वळत आहे, ही बाब सुदृढ राष्ट्रनिर्मिती संकल्पनेतील मोठा अडसर असून, आपणही समाजाचे काही देणे लागतो, या उदात्त भावनेने तसेच जनतेला व्यसनाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने नेमके काय करता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी आपण व्यसनमुक्तीवर फेलोशिपकडे वळलो आणि त्यात यश मिळाले.
व्यसनमुक्तीसाठी आपण सर्वप्रथम युवा पिढीवर लक्ष केंद्रित करणार असून, त्यासाठी जनजागृतीसह विद्यालय, महाविद्यालयात शिबिरे घेऊन विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांना व्यसनी पाल्य कसे ओळखावे, लक्षणे कोणती,व्यसनाचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन करणार आहोत. तसेच पोलीस विभाग राज्य राखीव पोलीस दलात शिबिरे घेऊन प्रबोधन करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मनुष्य व्यसनाच्या आहारी का जातो, याची कारणे विषद करताना डॉ. सेठीया म्हणाले की, विद्यालय आणि महाविद्यालयातील मुले मौजमस्तीसाठी सिगारेट आणि अन्य व्यसनांना बळी पडतात. त्यानंतर व्यसन हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आणि सवय बनू लागते. सर्वसाधारणपणे विविध अडचणी, समस्या, वाढती बेचैनी ही दारू, सिगारेट आणि अमली द्रव्याच्या सेवनामुळे कमी होते, असा गैरसमज प्रत्येकाचा बनला आहे. या व्यसनामुळे काही काळ तरतरी वाटत असलीतरी हळू व्यसन ही सवय बनत जाऊन, जीवन अंधकारमय बनू लागते त्यातून विविध दुर्धर आजार जडतात. व्यसनी व्यक्ती स्वतःच्या भावनांवर, विचारांवर नियंत्रण गमावून बसते. व्यक्तीला मुळात काही स्वभाव दोष, मानसिक विकार असतील तर ते उफाळून येतात. बोलण्यातली सुसंगती बिघडते. वागण्यातला तोल बिघडतो. अशी वागण्या बोलण्यातील ताळतंत्र गमावलेली व्यक्ती आपलं सामाजिक जीवन त्रासाचं करुन घेते. कुटुंबातील इतर सदस्यांना त्या वागण्याचा त्रास होतो. व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला उपचारासाठी व्यसनमुक्ती केंद्रात आणणं बऱ्याचवेळा कठीण असतं. कारण काही व्यक्तींना भीती असते की, व्यसन केलं नाही तर आपल्याला झोप लागणार नाही, हातापायांचा थरकाप झाल्यामुळे काम होणार नाही, अस्वस्थ वाटेल, चिडचिड होईल, त्रास होईल म्हणून आपल्याला व्यसन सोडता येणं कठीण आहे, असं त्यांना वाटतं. मात्र व्यसनातून मुक्त होण्यासाठी इच्छाशक्तीची मोठी गरज असते अन् ती व्यसनमुक्ती केंद्रात निर्माण करणं शक्य होतं. व्यसन सोडताना जो त्रास व्यसनी व्यक्तीला होतो, त्याला विथड्रावल सिम्पटम्स म्हणतात. उपचारांनी ते कमी करता येतात आणि व्यसन सोडणं सोपं जातं, शक्य होतं. याची खात्री पटली की काही लोकं औषधांची, डॉक्टरांची मदत घ्यायला तयार होतात. अशा लोकांवर औषधोपचार आणि समुपदेशन या दोन्हींच्या मदतीने चांगले उपचार करणं शक्य होतं. ज्या व्यसनी व्यक्ती डॉक्टरांकडे येण्यासाठी तयार नसतात, त्यांच्यासाठीदेखील वेगळे पर्याय सुचवले जातात. व्यवस्थित उपचारांनंतर काही लोक पूर्णपणे व्यसनमुक्त राहू शकतात. तर काही लोक पुन्हा वेगवेगळ्या कारणांमुळे पुन्हा व्यसनांकडे वळण्याची शक्यता असते. कारण फक्त मनाचा निश्चय करुन व्यसनमुक्त होणं सगळ्यांना जमत नाही. त्यासाठी विचारसरणी आणि जीवनशैलीमध्ये बरेच बदल करावे लागतात. हे बदल घडायला वेळ लागतो आणि तोपर्यंत व्यसनमुक्त राहण्यासाठी अशा व्यक्तीला काही दिवस व्यसनमुक्ती केंद्रात उपचारांनी फायदा होऊ शकतो. असेही त्यांनी सांगितले.
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button