पगार काढण्यासाठी शिक्षकाला मागितली लाच; मुख्याध्यापक आणि काळजीवाहक अडकले जाळ्यात
जालना-पगार काढण्यासाठी दर दरमहिन्याला लाच म्हणून पैसे न दिल्यामुळे मुख्याध्यापकाने शिक्षकाचा पगार आडवला आणि संतापलेल्या शिक्षकाने या शिक्षकासह शाळेच्या काळजीवाहकालाच लाचेच्या जाळ्यात अडकवले. ही घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात असलेल्या चहाच्या दुकानात घडली.
जुना जालन्यात स्वयंवर कार्यालया शेजारी असलेल्या स्वर्गीय राजीव गांधी निवासी मूकबधिर विद्यालयातील हा प्रकार आहे. स्वर्गीय राजीव गांधी निवासी मूकबधिर विद्यालय येथे युसूफ लल्लू परसूवाले हे मुख्याध्यापक तर दत्तात्रय घोलप हे काळजी वाहक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान मुख्याध्यापक परसुवाले यांनी याच शाळेतील शिक्षकाने पगार काढण्यासाठी पैसे न दिल्यामुळे त्यांचा पाच महिन्याचा पगार काढून ठेवला होता. ही पगाराची रक्कम काढण्यासाठी संबंधित तक्रारदाराने मुख्याध्यापक परसुवाले यांच्याकडे वारंवार विनंती केली, मात्र मुख्याध्यापकांनी ती धुडकावून लावली आणि पाच महिन्याचा पगार काढण्यासाठी पाच हजार रुपये आणि पगार काढण्यासाठी आवश्यक असलेले संस्था अध्यक्षांचे पत्र आणण्यासाठी अतिरिक्त दोनशे रुपये अशी पाच हजार दोनशे रुपयांची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नव्हती त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क केला. या तक्रारीची दिनांक 2 डिसेंबर रोजी या विभागाने शहानिशा केली आणि त्यामध्ये तथ्य आढळून आले. त्यानुसार आज दिनांक 20 डिसेंबर रोजी जालना जिल्हा परिषदेच्या परिसरात असलेल्या एका चहाच्या दुकानात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि तक्रार दाराकडून पाच हजार दोनशे रुपये स्वीकारताना या शाळेचे मुख्याध्यापक युसूफ लल्लू परसुवाले आणि त्यांना मदत करणारा काळजीवाहक दत्तात्रय सोपान घोलप यांना रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जालना येथील पोलीस निरीक्षक एस. एस. काटे अमलदार शिवाजी जमदाडे, गजानन घायवट ,गजानन कांबळे, कृष्णा देठे, गणेश भुजाडे आदींनी ही कारवाई केली.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna