मोकाट कुत्र्याने केला बालकावर हल्ला; गालाचा तोडला लचका
जालना -शहरामध्ये गेल्या चार-पाच वर्षांपासून मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे .नगरपरिषदेला वारंवार पत्र देऊनही यावर काहीच तोडगा निघाला नाही. विशेष करून मांसाहार विक्री होत असलेल्या दुकानांच्या आजुबाजूला अशा मोकाट कुत्र्यांची संख्या जास्त आहे. या कुत्राच्या टोळक्याकडे पाहिल्यानंतर मोठ्या माणसाला भीती वाटते, तिथे बालकाचे काय? असाच प्रकार आज सकाळी जुन्या जालन्यातील समर्थ नगर भागात घडला.
या मंदिर परिसरात राहणाऱ्या डफडे परिवाराच्या साईराज राहुल डफडे हा चार वर्षाचा मुलगा रस्त्यावर खेळत होता तेवढ्यात एका कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला आणि पाहता -पाहता आणखी काही कुत्रे जमा झाले, या हल्ल्यामध्ये कुत्र्यांनी साईराज च्या मान्यवर चांगला चावा घेतला आणि गालाचा ही लचका तोडला. येथून जवळच सामान्य रुग्णालय असल्यामुळे साईराजला त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले. आणि वेळीच उपचारही सुरू झाले. कुत्रा चावल्यानंतर आवश्यक असणारे सर्व औषधी रुग्णालयात उपलब्ध असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान कुत्र्याच्या हल्ल्यात झालेल्या जखमेमुळे पडलेले व्रण जातील की नाही हे सांगणे कठीण असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.दरम्यान शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांचे प्रमाण गेल्या पाच वर्षांपासून वाढलेले आहे विशेष करून मांसाहार विक्री होत असलेल्या दुकानांच्या परिसरात ही मोकाट कुत्री राहतात. दिवसा इतरत्र कुठेतरी लपून बसतात आणि संध्याकाळच्या वेळी रस्त्यावर जमा होतात. नूतन वसाहत येथे मोठ्या प्रमाणात मांसाहाराची दुकाने उघड्यावर आहेत त्यामुळे या भागात कुत्र्यांचे ही प्रमाण जास्त आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांमुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागते. आज साईराज वर झालेल्या हल्ल्यामध्ये केवळ त्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला आहे. त्यामुळे जालन्यातील नागरिकांनी गल्ली बोळा मध्ये मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांपासून आपल्या मुलांचे रक्षण करण्यसाठी लक्ष देणे आता गरजेचे झाले आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna