आज पुन्हा मोकाट कुत्र्यांचा बालकावर हल्ला
जालना- आज दुसऱ्या दिवशीही मोकाट कुत्र्यांच्या बालकांवर हल्ला करण्याची मालिका सुरूच आहे. जालना शहरातील समर्थ नगर भागामध्ये काल चार वर्षाच्या साईराज राहुल डफडे या अंगणात खेळणाऱ्या बालकावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला होता. यामध्ये साईराज चांगलाच जखमी झाला आहे. त्याच भागामध्ये त्याच वेळेला आज पुन्हा एकदा मितेश अविनाश उमरे या दोन वर्षाच्या बालकावर पुन्हा या मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला आहे.
यामधे मितेश च्या अंगावर चावा घेतल्याच्या चांगल्या जखमा झाल्या आहेत. दैव बलवत्तर म्हणून मितेशला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवण्यात परिवाराला यश आले आहे. आठ दिवसांपूर्वी याच भागांमध्ये अशाच मोकाट कुत्र्यांनी एका डुकरावर हल्ला केला होता आणि त्यामध्ये डुकराचा फडशा पाडला होता. मांसाहाराचे लालची झालेले कुत्रे आता बालकांवर देखील हल्ला करायला लागले आहेत. यासंदर्भात या प्रभागाचे नगरसेवक शशिकांत घुगे यांनी वर्षभरापूर्वीच नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती मात्र त्याकडे पालिकेने अद्याप पर्यंत लक्ष दिले नाही. समर्थ नगर भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मांसाहाराची मोठ्याप्रमाणात उघडी दुकाने आहेत त्यामुळे या भागात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठी आहे. सायंकाळच्या नंतर मांसाहाराच्या दुकानांवर ताव मारल्यानंतर रात्री बाराच्या सुमारास या कुत्र्याचे टोळके मुख्य रस्त्यावर फिरताना दिसून येते. त्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा बालकांकडे वळविला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna