पोलीस उपाधीक्षकांचे लाचखोरी प्रकरण ;तिघांना मिळाला जामीन
जालना
जालना जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या पोलीस दलात खळबळ उडवून देणाऱ्या पोलीस उपअधीक्षकांच्या लाचखोरी प्रकरणी न्यायालयाने आज तिघांनाही जामीन दिला . शनिवारी सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने आज सोमवार पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती दरम्यान या दोन दिवसाच्या कार्यकालात पोलीस उपाधीक्षक सुधीर खिरडकर यांच्याविरुद्ध वातावरण तापले आणि विविध संघटनांनी काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता,तसेच त्यांच्या विरोधात निवेदन यांचा भडिमार केलाहोता. या पार्श्वभूमीवर आज आरोपींना न्यायालयात न आणता व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे ही सुनावणी घेण्यात आली.
पूर्वाश्रमीचे शिक्षक असलेल्या जालन्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी तथा उपाधिक्षक सुधीर खिरडकर यांना दोन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी गुरुवार दिनांक 20 मे रोजी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्यासोबत या प्रकरणात त्यांचे सहकारी असलेल्या कदीम जालना पोलिस ठाण्यातील संतोष अंभोरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील संतोष खाडे यांनाही ताब्यात घेतले होते असे एकूण तीन आरोपी या विभागाने ताब्यात घेतले आणि जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
21 तारखेला झाला गुन्हा दाखल
20 तारखेला दुपारी एक वाजेच्या सुमारास जालना तालुक्यातील कडवंची या गावात दोन लाख रुपयांची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्याला पकडले. ही घटना घडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तीनही पोलीस कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली. हे पथक बाहेर जिल्ह्याचे असल्यामुळे त्यांनी कसलीही कसर सोडली नाही. त्यामुळे भक्कम पुरावे देखील त्यांनी या जमा केले, आणि शुक्रवार दिनांक 21 रोजी दुपारी बारा वाजता या तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये तालुका जालना पोलीस ठाणे गुन्हा दाखल केला.
दरम्यान न्यायालय सध्या दुपारपर्यंत सुरू आहे आणि पोलिसांची देखील न्यायालयीन प्रक्रिया बाकी असल्यामुळे दिनांक 21 रोजी या तिघांनाही कोर्टात हजर करता आले नाही. म्हणून शनिवार दिनांक 22 रोजी या निकालासाठी विशेष न्यायालय भरले आणि न्यायमूर्ती श्री सूर्यवंशी यांनी उपाधीक्षक सुधीर खिरडकर यांच्यासह अन्य दोन्ही कर्मचाऱ्यांना सोमवार म्हणजेच आज दिनांक 24 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
सामान्य रुग्णालयात रवानगी
दरम्यान न्यायालयाने हा निर्णय सुनावताच सुधीर खिरडकर यांचा रक्तदाब वाढला आणि त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले, मात्र येथे स्वतंत्र प्रभाग नसल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आणि तिथे उपचार घेतल्यानंतर रविवारी रात्री त्यांना जालना येथील मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते.