महिला काँग्रेस कमिटीचे गोवरी आंदोलन
जालना- जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने महागाईच्या विरोधात मोदी सरकारचा निषेध करत गोवरी आंदोलन करण्यात आले. आज दिनांक 19 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जालना जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष विमल आगलावे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या महिलांनी सोबत आणलेल्या गोवऱ्या दाखवून गॅस परवडत नसल्यामुळे आता गोवऱ्यावर स्वयंपाक करायची वेळ आली आहे. तसेच मोदी सरकारने उज्वला गॅस ही फसवी योजना आणून सामान्य माणसांना पेट्रोल, डिझेल ,गॅस दरवाढ करून महागाईच्या खाईत लोटले आहे ,असा आरोपही उपस्थित महिलांनी केला. या आंदोलनामध्ये प्रमिला सूर्यवंशी, गंगा काळे, रेणुका शिंदे, दिपाली पांगारकर, कांता शिरगुळे आदि महिलांसह काँग्रेसचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.