…..अखेर पोलिसांनीच केला त्या महिलेचा अंत्यविधी
जालना- दोन दिवसांपूर्वी सामनगाव रस्त्यावर सापडलेल्या एका अनोळखी महिलेची ओळख शेवटपर्यंत पटलीच नाही. त्यामुळे शेवटी पोलिसांनाच या महिलेचा अंत्यविधी करावा लागला. अंबड रस्त्यापासून काही अंतरावरच असलेल्या सामनगाव रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी एका 45 वर्षीय विवाहितेचा मृतदेह पुलाच्या बाजूला आढळून आला होता. तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून या महिलेचा मृतदेह ओळख पटविण्यासाठी सामान्य रुग्णालयात ठेवला होता. गुरुवारी दिवसभर जिल्ह्यातील चार ठिकाणच्या विविध नागरिकांनी येऊन ही ओळख पटविण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांनी देखील नातेवाईक हरवल्या च्या तक्रारी संबंधित पोलिस ठाण्यात दिल्या होत्या, मात्र ही महिला त्यांची हरवलेली व्यक्ती नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे तालुका पोलिसांनी काल शुक्रवारी या महिलेची उत्तरीय तपासणी करून अंत्यविधी केला. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका तुपे आणि पोलीस कॉन्स्टेबल काकड यांच्या उपस्थितीत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा मृतदेह जमिनीत पुरून अंत्यविधी केला.
*महिलेच्या अंगावर बनावट दागिने*
ज्या महिलेचा मृतदेह सापडला आहे ती महिला सुमारे 45 वर्षाची विवाहित महिला असल्याचे पुढे आले आहे, मात्र या महिलेच्या अंगावर असलेले मंगळसूत्र, बोटातील अंगठी, आणि पायामधील पैंजणे हे दागिने सोन्या-चांदीचे नसून बाजारामध्ये हातगाडीवर मिळणारे साधे दिखाऊ दागिने असल्याचे समोर आले आहे. दरम्यान ओळख पटविण्यासाठी भविष्यात जर या महिलेची ओळख पटविण्याचे काम पडले तर पोलिसांनी या महिलेचे कपडे आणि अन्य वैद्यकीय वस्तू जमा करून ठेवल्या आहेत.
*बाहेरून आणून टाकला मृतदेह*
प्राथमिक माहितीनुसार हा मृतदेह पहाटे उजाडण्यापूर्वी म्हणजे तीन -चार वाजेच्या सुमारास आणून टाकला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच हा मृतदेह पुलाच्या कठड्यावर ठेवून अलगदपणे खाली सोडला असल्याचेही सांगण्यात येत आहे, मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप करण्यात आला असून तो मुद्दामूनच पालथा टाकला असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.