बेघरांच्या लग्नासाठी “आपुलकीचे” निमंत्रण
जालना जालना-केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जालना शहरात नगरपालिकेच्या वतीने बेघरांसाठी आपुलकी हे निवारा केंद्र चालविले जाते. नगरपालिकेने कैलास ब्रिगेड या सामाजिक संस्थेला हे केंद्र चालवण्याची जबाबदारी दिली आहे. त्या अनुषंगाने या निवारा केंद्रांमध्ये मागील महिन्यात आलेल्या दोन दृष्टिहीन बेघरांच्या विवाह 16 जुलैला सकाळी साडे अकरा वाजता लावण्यात येणार आहे आणि या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन नगरपालिकेचे शहर अभियान व्यवस्थापक विजय सांगळे यांनी केले आहे.
आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी या विवाह सोहळ्याचे मुख्य संयोजक कैलास ब्रिगेडचे अध्यक्ष अरुण सरदार, यांच्या सह सचिव वैशाली सरदार, अलका झाल्टे, दृष्टिहीन बेघर श्याम तांबे आणि माया कांबळे यांचीही यावेळी उपस्थिती होती .
*आपुलकीने केले मनोमिलन*
या संदर्भात बोलताना संस्थेचे अध्यक्ष अरुण सरदार म्हणाले की, या बेघर निवारा केंद्रांमध्ये रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या वृद्ध व्यक्तींना तसेच बेघर व्यक्तींना निवारा दिल्या जातो. या केंद्रात 24 जून रोजी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील तााबापुरी येथे राहणारा श्याम बाबा तांबे हा 38 वर्षीय दृष्टिहीन तरुण दाखल झाला. त्याच दरम्यान दिनांक 30 जून रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील खांडज येथे राहणाऱ्या माया कांबळे या 36 वर्षीय बिघर दृष्टिहीन तरुणी दाखल झाल्या. त्यानंतर त्यांच्यासोबत वारंवार चर्चा करताना या दोन्ही दृष्टिहीन बेघरांच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला असता त्याला त्यांनी संमती दिली. आणि 16 जून रोजी हा विवाह सोहळा होत आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कैलास गोरंट्याल आणि नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी देखील या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.