औरंगाबाद- जालना महामार्गावर पडले मोठमोठे खड्डे
बदनापूर- कोरोनामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा घेत टोलवेज कंपनीने मान्सूनपूर्व दुरुस्ती न केल्यामुळे जालना-औरंगाबाद महामार्गावर मोठ मोठे खोल खडडे पडल्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवताना कसरत करावी लागतआहे. वाहतुकीचा जागोजागी खोळंबा होत आहे. मोटारसायकल व छोटया वाहनांना खडडयांचा अंदाज येत नसल्यामुळे छोटे – मोठे अपघात होत आहेत.
*कमी वाहतूक असतानाही केली नाही दुरुस्ती*
कोरोना रोगाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून शासनाच्या वतीने दुसऱ्या लाटेनंतर मार्च महिन्याच्या मध्यापासून लॉकडाऊन करण्यात आले होते. त्या दरम्यान महामार्गावर अतिशय कमी वाहतूक होत होती. जालना ते औरंगाबाद हा ६० किलोमीटर लांबीचा रस्त्यावर दोन ठिकाणी टोल वसूल केला जातो. या रस्त्याची निर्मिती व देखभाल टोलवेज कंपनीकडूनच करण्यात येते. मात्र. लॉकडाऊनमुळे कमी असलेल्या वाहतुकीचा गैरफायदा सदरील कंपनीने घेऊन मान्सूनपूर्व दुरुस्तीच केलेली नाही. वास्तविक जानेवारीनंतर या रस्त्याचे मान्सूनपूर्व कामे करून मजबुतीकरण, अस्तरीकरण करण्याची आवश्यकता असते. ज्यामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतरही हा महामार्ग खडडेमुक्त राहत असतो.
*प्रशासनाचे दुर्लक्ष : टोलवेज कंपनीचा कामचुकारपणा*
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन कोरोनाच्या कामात असल्यामुळे झालेल्या दुर्लक्षाचा या टोलवेज कंपनीने गैरफायदा घेऊन महामार्गाच्या दुरुस्ती कामाकडे दुर्लक्ष केले. खडडयांचा अंदाज न आल्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत तर अनेक चारचाकी गाडयांचे चेंबर फुटून नुकसान होत आहे. जालना-औरंगाबाद टोलवेज कंपनी जालना ते औरंगाबाद या चार पदरी रस्त्यावर नागेवाडी (जालना) व लाडगाव (औरंगाबाद) या दोन ठिकाणी टोल जमा करते.
रस्त्यावर पडले मोठमोठे खडडे
टोलवेज कंपनी खडडे पडल्यानंतर पडलेल्या खडडयात खडी व मुरुमाचा भरणा करून खडडे बुजावण्याचा तोकडा प्रयत्न करते परंतु रिमझीम पावसामुळे या मुरुमामुळे खडडयाच्या बाहेर चिखल होऊन त्याचाही वाहनधारकांना त्रासच होतो.
* अस्तरीकरण करण्याची मागणी*
औरंगाबाद ते जालना रस्त्यावर डांबराचा थर मारुन अस्तरीकरण करून संपूर्ण रस्त्याचे नुतनीकरण करून वाहनधारकांचा त्रास थांबवण्याची मागणी होत आहे. मागच्या वर्षीही पावसानंतर या महामार्गावर प्रचंड खडडे पडून दूरवस्था झालेली होती. परंतु तेव्हाही टोलवेज कंपनीने थातूर मातूर काम केल्यामुळे या वर्षी पहिल्याच पावसाने या रस्त्यावर खडयाचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. तसेच थोडाशा पावसातच संपूर्ण रस्ता उखडल्यामुळे या कामाच्या गुणवत्तेविषयी संशय व्यक्त होत असून या रस्त्याचे त्वरित मजबुतीकरण व अस्तरीकरण करण्याची मागणी होत आहे.
*राजकारण्याचे दुर्लक्ष : परमेश्वर जऱ्हाड*
या बाबत बदनापूर येथील सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर जऱ्हाड यांनी तर या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत टोलवेज कंपनी बरोबरच थेट राजकारण्याचे होत असलेले दुर्लक्ष अधोरेखित करून हा हायवे लवकरात लवकर दुरुस्त करावे अशी मागणी केली.
ताज्या आणि परिपूर्ण बातम्यांसाठी डाउनलोड करा edtv jalna app ॲप