Jalna Districtजालना जिल्हा

340 टन कांदा घेऊन पहिली किसान रेल्वे उद्या आसाम कडे धावणार

जालना -जिल्ह्यातून शेतकऱ्यांसाठी फायद्याची असलेली  पहिली “किसान रेल्वे” उद्या सकाळी दहा वाजता रवाना होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री खासदार रावसाहेब दानवे हे या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून रवाना करणार आहेत.

जालना जिल्ह्यातून ही पहिलीच रेल्वे रवाना होत आहे, आणि या रेल्वेने 340 टन  कांदा आसाम राज्यातील जोराहट येथे जाणार आहे .जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या बी.जे. जी. प्रोडूसर कंपनी च्या माध्यमातून हा कांदा पाठविला जात आहे. नाशिक, औरंगाबाद, आणि जालना जिल्ह्यातून एकत्रित केलेला हा  तीनशे चाळीस टन कांदा आहे.
उद्या दिनांक 2 रोजी निघालेली ही रेल्वे 6 तारखेला जोराहट येथे पोहोचेल .याबद्दल बी.जे.जी. कंपनीचे संचालक गणेश पडुळ यांनी माहिती देताना सांगितले ,की अन्य वेळी आणि इतर साधनाने हा कांदा पाठवण्यासाठी मोठा खर्च येतो, त्या तुलनेत रेल्वेने पाठवलेल्या शेतकऱ्यांच्या मालाला अत्यल्प खर्च येत असून तो सुरक्षितही पोहोचविला जातो, आणि वेळही कमी लागतो .त्यामुळे किसान रेल्वेची जालना जिल्ह्यासाठी अत्यंत गरज होती. आता ती सुरू झालेली आहे. या माध्यमातून आता मोसंबी आणि अन्य फळेही इतर राज्यात पाठवता येतील. याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.


* पंधरा दिवसच टिकतो कांदा*
सध्या पाठवण्यात येणारा कांदा हा लाल कांदा असल्यामुळे तोडल्या पासून 15 दिवसाच्या आत मध्ये त्याचा वापर करावा लागतो. त्या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी तोडलेला हा कांदा आज जालन्यात आला आणि अजून चार दिवस त्याला नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणार आहेत.  त्यापुढील पाच सहा दिवसांमध्ये हा कांदा विक्री करून ग्राहकांनी वापरात आणावा लागणार आहे. पर्यायाने रेल्वेची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

Related Articles