पत्रकारांनी भवितव्यासाठी जागरूकपणे काम करावे- प्रमोद धोंगडे
जालना- पत्रकार बातमीचा पाठपुरावा करतांना खूप मेहनत घेतात, मात्र स्वतःच्या आरोग्याबरोबरच भवितव्याची म्हणावी तशी काळजी घेत नाही. त्यामुळे उतारवयात पत्रकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ज्याप्रमाणे आपण बातमीसाठी कागदोपत्री पुरावे जमा करतो, त्याचप्रमाणे पत्रकारांनी पत्रकारितेच्या कारकिर्दीत केलेल्या कामाचे, अनुभवाचे पुरावे आपल्याजवळ जतन करून ठेवावे. जेणेकरून भविष्यात त्याचा उपयोग पत्रकारांसाठी असलेल्या निवृत्ती वेतनासह विविध शासकीय योजनांसाठी होऊ शकतो. त्यामुळे पत्रकारांनी स्वतःच्या भवितव्यासाठी जागरूकपणे काम करावे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांनी आज येथे केले.
जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने येथील पत्रकार भवनात दर्पण दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी ‘दर्पण’ कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री स्वर्गीय सिंधुताई सपकाळ आणि वर्षभरात मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष फकीरा देशमुख होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानदेव पायगव्हाणे, सहायक माहिती अधिकारी अमोल महाजन, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष किशोर आगळे, जिल्हा सरचिटणीस नारायण माने, उपाध्यक्ष अभयकुमार यादव, कोषाध्यक्ष धनसिंह सूर्यवंशी, चिटणीस शेख मुसा, कार्यकारिणी सदस्य गणेश औटी, धनंजय देशमुख, संतोष सारडा आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे म्हणाले की, शासनाच्या वतीने पत्रकारांसाठी अधिस्वीकृती पत्रिका योजना, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी, पत्रकार सन्मान योजना, निवृत्ती वेतन योजना, वैद्यकीय मदत निधी, पत्रकार सुरक्षा कायदा, अशा योजना राबविण्यात येत आहेत. अनेक पत्रकार अनेक वर्षे पत्रकारितेत काम करूनही, त्यांच्याकडे पत्रकारितेसंदर्भातील कागदपत्रे, पुरावे नसल्यामुळे त्यांना ऐनवेळी शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे पत्रकारांनी यापुढील काळात आपण बातमीचे पुरावे ज्यापद्धतीने जमा करतो, त्याचप्रमाणे आपल्या आरोग्य आणि भवितव्यासाठी लागणारी पत्रकारितेच्या करकीर्दीतली कागदपत्रे जतन करून ठेवावीत, तसेच, कोविडच्या संकटात पत्रकारिता करतांना आपल्या व कुटुंबाच्या आरोग्याचीही पत्रकारांनी काळजी घ्यावी, असे आवाहन श्री. धोंगडे यांनी केले आहे.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार ज्ञानदेव पायगव्हाणे म्हणाले की, पूर्वीची पत्रकारिता आणि अलीकडच्या काळातली पत्रकारिता यात मोठा फरक आहे. अलीकडे मोठ्या प्रमाणात साधने उपलब्ध झालेली असली तरीदेखील स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी पत्रकार आपल्या जीवाचे रान करून जनतेचे प्रश्न मांडतात. जनतेचे प्रश्न मांडत असतांना पत्रकारांचे आपल्या वैयक्तिक आयुष्यबरोबरच कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. यातूनच आरोग्याबरोबरच अनेक समस्यांना पत्रकारांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे पत्रकारांनी पत्रकारिता करतांना आपल्या आरोग्याची आणि कुटुंबाची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन श्री. पायगव्हाणे यांनी केले.
अध्यक्षीय समारोप करतांना फकिरा देशमुख म्हणाले की, जालना जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी जालना जिल्हा मराठी पत्रकार संघ कटिबद्ध आहे. पत्रकारांसाठी गृहप्रकल्प उभारण्यासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचा अपघात विमा उतरविण्यात येणार आहे. कोविडची परिस्थिती निवळल्यानंतर सर्व पत्रकारांची एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे, असे श्री. देशमुख यांनी सांगितले.
प्रारंभी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष किशोर आगळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात कोरोना नियमांचे पालन करीत सर्व पत्रकारांचा शाल व पुष्पहाराने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोषाध्यक्ष धनसिंह सूर्यवंशी यांनी केले. आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस नारायण माने, इलियास लखारा यांनी मानले.
याप्रसंगी रवींद्र मुंडे, सुशीलकुमार वाठोरे, लहूराव गाढे, विजय साळी, अमित कुलकर्णी, अनिल व्यवहारे, विजय सोनवणे, अनिल परदेशी, शरद खानापुरे, सुनील खरात, जावेद तांबोळी, नागेश बेनिवाल, बाळू खडेकर, नंदलाल बठेजा, के. डी. दांडगे,बाबासाहेब कोलते, राम भालेराव, अब्दुल गनी आदी पत्रकार उपस्थित होते.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna