राजस्थानी घेवर घेतंय महाराष्ट्रीय लोकांच्या जिभेचा ताबा
जालना -संक्रांतीची चाहूल लागताच जालन्यात आणखी दुसरी चाहूल दिसते ती म्हणजे शहरातील बडी सडक वर थाटलेल्या “घेवर”च्या बड्या- बड्या दुकानांची, नव्हेतर बडी सडक वर “घेवर”ची दुकाने दिसली की संक्रांत येत आहे असे समजायला हरकत नाही.
आठ दिवसांवर संक्रांत आली आहे आणि आता घेवर आणि फेणी यांचा हा व्यवसाय तेजीत यायला लागला आहे. स्वादिष्ट, आकर्षक केशरी रंगातील आणि चवीला कमी, जास्त प्रमाणात गोड करता येणारा “घेवर” नावाचा हा पदार्थ आहे .खरं तर मूळ पदार्थ हा राजस्थानचा आहे . परंतु जालन्यात मारवाडी समाज बांधव बहुसंख्येने असल्यामुळे त्यांचे राजस्थानशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे बडी सडक वर मारवाडी समाज राहत असलेल्या वस्तीमध्ये अशा प्रकारची मोठ- मोठी दुकाने सजली आहेत.
हा पदार्थ तयार करण्यासाठी विशेष प्रकारचे साहित्य लागते त्यामुळे सुरुवातीला घेवर तयार करण्यासाठी राजस्थान मधूनच कारागीर येत होते. आता स्थानिक कारागिरांनी देखील हे कसब आत्मसात केलं आहे. मराठवाड्यामध्ये फक्त जालन्यातच अशा पद्धतीचे हे घेवर पक्वान्न तयार केल्या जातात . ज्यावेळी तयार केलं त्यापासून सुमारे पंधरा दिवस हे खाण्यासाठी देखील उपयोगात आणले जाते. मैदा आणि तूप वापरून तयार केलेला पदार्थ नंतर साखरेच्या पाकात बुडवतात आणि हव्या त्या वेळी तो वापरला जातो. याचे विशेष महत्त्व म्हणजे ज्यांच्या घरी शुभकार्य झाले आहे, विशेष करून नववधूच्या सासरी माहेरची मंडळी कडे तसेच पाहुण्यांकडे भेटवस्तू म्हणून देखील घेवर पाठविले जाते. घेवर सोबतच फेण्या देण्याचीही प्रथा रूढ झाली आहे. परंतु फेण्या मात्र बाहेरून आणल्या जातात आणि घेवर सोबत विकल्या जातात.
दिवसेंदिवस मधुमेहाची रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे घेवरच्या चवीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. बिना साखरेचे घेवर, कमी साखरेचे घेवर, असेही प्रकार यामध्ये आहेत .
*बस बंदचा फटका* गेल्या तीन-चार महिन्यांपासून बस सेवा बंद आहे .याचा फटका या व्यवसायाला देखील बसला आहे .कारण जानेवारीच्या सुरुवातीलाच सुरू झालेले हे घेवर इतर ठिकाणी पाठवण्यासाठी दोन-तीन दिवस लागतात आणि त्या अनुषंगाने जालन्यातील पाहुणे बाहेरगावी पाठवण्यासाठी बसचा मोठ्या प्रमाणात उपयोग करतात ,मात्र सध्या बस बंद असल्यामुळे पाहुण्यांना हा पाठवायचा कसा? हा प्रश्न आहे आणि त्याचाही परिणाम विक्रीवर झाल्याची माहिती घेवर विक्रेते विनोद परदेशी यांनी दिली.
* असे आहेत दर(किलोमध्ये)*
साधे साखरा मधील घेवर 250 ते 300 रुपये.
शुद्ध तुपातील घेवर 550 ते 600 रुपये.
बिना साखरेचे घेवर 300ते350 .
सांबर फेनी 400-450 रुपये.
(आपल्याकडेही असे वेगळे पदार्थ तयार होत असतील तर जरूर कळवा.)
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna